गाय – म्हशीचं नेमकं वय किती आहे, हे कसं ओळखाल ? जनावरांची खरेदी-विक्री, विमा उतरवण्यात येईल कामी…

0

शेतीशिवार टीम : 14 जुलै 2022 :- Cows and buffaloes Age calculator in marathi :- जर तुम्ही पशुपालन करत असाल किंवा जनावरे विकत घ्यायची असतील तर आपल्या मनात पहिला प्रश्न येतो की जनावरांचे वय कसे शोधायचे? कारण प्राण्यांचे वय जाणून घेण्यासाठी योग्य माहिती आणि अचूक ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे.

दूध व्यवसायात असलेल्या लोकांसाठी तरुण जनावरे विकत घेणे फायदेशीर ठरते. म्हशीबद्दल बोलायचे झाले तर साधारण ४-५ वर्षांची म्हैस घेणे फायदेशीर ठरते. त्याच प्रकारे 3-4 वर्षांची गाय दूध देण्यास सक्षम असते. गाय आणि म्हशीचे वय जाणून घेण्यासाठी अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. परंतु प्राण्यांच्या वयाची योग्य आणि अचूक माहिती त्यांना पाहून, त्यांच्या दात आणि शिंगांवरून मिळते. कदाचित बाह्य दुखापतीमुळे कधीकधी शिंगे तुटू शकतात. अशा वेळी गाय आणि म्हशींचे वय त्यांच्या दातांवरून तपासले पाहिजे.चला तर पाहूया, गाई – म्हशींचे अचूक वय जाणून घेण्याच्या पद्धती….

जनावरांचे वय ओळखण्याच्या पद्धती –

जनावरांच्या शारीरिक ठेवणीवरून.
जनावरांच्या दातांच्या संख्येवरून.
जनावरांच्या शिंगांवरील वलयांवरून .
जनावरांच्या शरीरावरुन.

जनावरांस पाहून आपण सहजरित्या लहान वासरे, तरुण जनावरे किंवा म्हातारी जनावरे असा अंदाज लावू शकतो.

लहान गटात वासरे,पारडे तर तरुण म्हणजे साधारण मध्यम वयाच्या, मध्यम आकाराच्या जनावरांचा समावेश करता येईल, मध्यम जनावरे अतिशय चपळ, घट्ट आणि मऊ चामड्याचे असतात. त्याचे केसही मऊ चमकदार असल्याचं दिसत. त्यांच्या दातांची संख्या पूर्ण असते आणि दातांची इतकीशी झीज झालेली नसते.

तर म्हातारी जनावरे तुलनेने आकारात मोठे, ढिल्या- सैल कातड्याचे, मंद शरीराचे असतात. त्यांचे दातही झिजत आलेले असतात.

( टिप :- या पद्धतीने अचूक वय समजणे थोडे कठीण असल्याने केवळ याच पद्धतीवर अवलंबून राहू नये.)

जनावरांच्या दातां वरून त्यांचे वय कसे जाणून घ्यावे ?

सर्व प्रथम, जनावरांचे दात कच्चे (दुधाचे दात) आहेत की टणक आहेत हे पहावे. कच्च्या दातांनंतर कठीण दात येतात. पक्के दात आकाराने मोठे आणि लांब व रुंद असतात.

कच्च्या दातांवरून वयाची माहिती :-

जन्माच्या वेळी वासराला 2 कच्चे दात येतात.
7 दिवसांच्या वासराला 4 कच्चे दात येतात.
15 दिवसांच्या वासराला 6 कच्चे दात येतात.
30 ते 45 दिवसात वासराला 8 कच्चे दात येतात.
वासरू 5 ते 6 महिन्यांचे झाल्यावर पहिली दहाड जोडी येते.
वासरू 15 ते 16 महिन्यांचे झाल्यावर दुसरी दहाड जोडी येते.
24 ते 28 महिन्यांच्या वासराला तिसरी दहाड जोडी येते.

पक्क्या दातांवरून वयाची माहिती :-

2 पक्के दात असल्यास गाईच वय 2 ते 2.5 वर्षे आणि म्हशीचे वय 2 पक्के दात असल्यास 2.5 ते 3 वर्षे इतके असते.

4 पक्के दात असलेल्या, गायीचे वय 3 वर्षे आणि म्हशीचे वय 3.5 वर्षे असते.

6 पक्के दात असलेल्या, गायीचे वय 4 वर्षे आणि म्हशीचे वय 4.5 वर्षे असते.

8 पक्के दात असल्यास त्या गाईचे वय 4.5 वर्ष तर म्हशीचे वय 5.5 वर्षे असते.

घासलेल्या दातांवरून वयाची माहिती :-

6 ते 7 वर्षांच्या वयात मध्यम कर्तन दात घासले जातात.
7 ते 8 वर्षांच्या वयात दुसरे कर्तन दात घासले जातात.
8 ते 9.5 वर्षांच्या वयात, तिसरे कर्तन दात घासले जातात.
तर वयाच्या 11 व्या वर्षी, चौथे कर्तन दात घासले जातात.

(टिप :- हि सर्वांत सुरक्षित पद्धत मानली जाते.)

जनावरांच्या शिंगावरून त्यांच्या वयाची माहिती :-

जनावरांच्या शिंगांचे बारकाईने निरीक्षण केल्यावर त्यावर वलय आढळून येते. यावरूनही आपण त्यांच्या वयाचा अंदाज घेऊ शकतो.

जसजसे जनावराचे वय वाढते तसतसे त्यांच्या शिंगावरील वलय अधिक उठून दिसू लागतात, त्या वरील वलयांची संख्या आणि आकार दोन्ही वाढू लागतात.

सर्वप्रथम वयाच्या 3 ऱ्या वर्षी पहिले वलय तयार होते.

(टिप :- यापद्धती पासून बचावासाठी आणि जनावराचे वय लपवण्यासाठी बहुतेकवेळा जनावरांची शिंगे घासून,रंगवून त्यावर तेल लावण्यात येते. यावेळी वलय दिसून येत नाही. यामुळे अचूक वय ओळखण्यात थोडी फार गफलत होऊ शकते.)

Leave A Reply

Your email address will not be published.