E-rights System : आता तलाठ्याकडे न जाता वारस नोंद, 7/12 तील चुका घरबसल्या करा दुरुस्त, पहा कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज प्रोसेस..
सातबारा उताऱ्यावरील वारसाची नोंद, मयताचे नाव कमी करणे, कर्जाचा बोजा चढवणे – उतरवणं यांसह इतर महत्वाच्या कामासाठी अर्ज दाखल करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने ‘ई – हक्क’ प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. एवढेच नव्हे, तर दाखल अर्जामध्ये जर कोणत्याही प्रकारच्या असल्यास त्या त्रुटी तलाठ्याकडून या पोर्टलवर अर्जदाराच्या लॉगिनमध्ये कळविण्यात येणार असल्यानेच त्रुटी देखील ऑनलाइन दुरुस्त करता येणार आहे. फेरफार नोंद करण्यासाठी ‘ई हक्क’ प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.
या प्रणालीच्या माध्यमातून आतापर्यंत दोन कोटींहून अधिक ऑनलाइन फेरफार नोंदविण्यात आले आहेत. तर फेरफारापैकी केवळ 26 लाख 50 हजार नोंदी या नोंदणीकृत दस्ताच्या आधारे झाल्या आहेत.
तलाठी आणि फेरफार नोंदीसाठी इच्छुक अर्जदार यांच्यामध्ये हा एक दुवा या प्रणालीच्या माध्यमातून तयार करण्यात आला असल्याने नागरिकांसाठी घरबसल्या सुविधा प्राप्त करता येणार आहे.
वारसाची नोंद करण्यासाठी किंवा मयताचे नाव कमी करण्यासाठी तलाठी कार्यालयात न जाता संकेतस्थळाला भेट देऊन, जिल्हा तालुका आणि गाव निवडून फेरफार अर्जाची परिपूर्ण माहिती भरल्यानंतर हा अर्ज थेट तलाठ्याच्या लॉगिनमध्ये प्रदर्शित होईल. अर्ज मंजूर होताच तलाठी ती फेरफार नोंद घेऊ शकेल.
अर्ज स्वीकृत होताच अर्जदाराला एसएमएस जाईल. ज्यामध्ये फेरफार क्रमांक नमूद असेल. जर त्रुटी आढळल्यास पूर्ततेसाठी अर्जदाराने जो मोबाइल क्रमांक नोंदवलेला आहे. त्याच क्रमांकावर एसएमएस जाईल. त्यामुळे हे संकेतस्थळ केवळ अर्ज दाखल करण्यासाठीच नसून त्रुटी दूर करण्यासाठी देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
वारस नोंद, 7/12 उताऱ्यातील चुका दुरुस्त करण्यासाठी
वारस प्रमाणपत्र प्राप्तीसाठी आवश्यक कागदपत्रे :-
विहित नमुन्यातील कोर्ट फी स्टम्प लावलेला अर्ज व शपथपत्र
मृत्यू प्रमाणपत्र
तलाठी अहवाल / मंडल अहवाल
शासकीय नोकरीस असल्याचा पुरावा (उदा. : सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा उतारा)
शिधापत्रिकेची (रेशन कार्ड) प्रत.
ग्रामपंचायत जन्म-मृत्यूचा नोंद वहीतील उतारा
सेवा पुस्तिकेत विहित नमुन्यातील वारसाचे नाव लिहिलेला असल्याचा पुरावा
वारस हक्क प्रमाणपत्र
नॉमिनी
नऊ प्रकारचे फेरफार करता येणार ऑनलाईन..
1) वारसाची नोंद करणे
2) मयताचे नाव कमी करणे
3) कर्जाचा बोजा चढविणे
4) कर्जाचा बोजा कमी करणे
5) ई-करार नोंदणी करणे
6) विश्वस्तांचे नाव बदलणे
7) अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे
8) एकत्र कुटुंब कर्त्याची नोंद कमी करणे
9) 7/12 उताऱ्यावरील चुका दुरुस्त करणे
राज्य सरकारकडून सातबाऱ्यावरील फेरफार अर्ज करणसाठी ई – हक्क ही ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर आता त्रुटी आढळल्यास तत्काळ अर्जदाराला एसएमएस पाठवून त्रुटी देखील ऑनलाइन दुरुस्त करण्यात येणार आहे. शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिकांना सहजतेने वापरता येईल अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी माहिती सरिता नरके, राज्य समन्वयक, (ई फेरफार प्रकल्प) यांनी दिली आहे.