राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी ; शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हांबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय !

0

शेतीशिवार टीम : 8 ऑक्टोबर 2022 :- महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला असून राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कारण आज केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला शिवसेनेवरील दाव्याबाबत उत्तर दाखल करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार त्यांनी कागदपत्रासह आज दावा दाखल केला होता.

त्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटानं केलेल्या दाव्यांवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीत तब्बल चार तास चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. आता ठाकरे गट किंवा शिंदे गटाला हे चिन्ह वापरण्यास मनाई घालण्यात आली आहे. अंधेरी पोटनिवडणूक आता धनुष्यबाण चिन्हावर लढवता येणार नाही. महत्त्वाचं म्हणजे शिवसेना पक्षाचं नावदेखील दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही गटांना आयोगाला पर्याय द्यावे लागणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह इतर आयुक्त, निवडणूक चिन्ह प्रभारी, निवडणूक न्याय विभागाचे अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या सुमारे 4 तास चाललेल्या बैठकीत हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांना 7 ऑक्टोबर रोजी कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. शिंदे यांनी आयोगाकडे कागदपत्रे सोपवून निवडणूक चिन्हावर आपला दावा केला होता. तर ठाकरे यांनी आज दुपारपर्यंत कागदपत्रे सादर केली होती.

ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे दावा केला होता की, त्यांचे विधानसभेत 14 आमदार, विधानपरिषदेत 12 आमदार, लोकसभेत 7 खासदार, राज्यसभेत 3 खासदार, राष्ट्रीय कार्यकारिणीत 160, 18 राज्य प्रभारी, 192 जिल्हा प्रमुख आणि 600 उपजिल्हा प्रमुख आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला या मुद्द्यावर लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली होती. मात्र, सर्व कागदपत्रे सादर होईपर्यंत आयोगाने घाईघाईने सुनावणी घेऊ नये, अशी विनंती ठाकरे गटाने केली होती. पोटनिवडणुकीत एकनाथ शिंदे कॅम्प आपला उमेदवार उभा करणार नाही, त्यामुळे आता चिन्हाची काय गरज आहे,ते भाजपला फायदा पोहचवणार आहे का ? असा युक्तिवादही त्यांनी केला.

मुंबईतील अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर आहे. त्यामुळे शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोग लवकरात लवकर निर्णय घेईल, अशी अपेक्षा करण्यात आली होती अन् त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आता उद्धव ठाकरेंसह शिवसैनिकांना मोठा धक्का दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.