काय सांगता ! होय, आता वर्षातून 3 वेळा खायला मिळणार ताजे आंबे ; ‘या’ शेतकऱ्याने केली जात विकसित, स्वतःही वर्षाला करतोय कोट्यवधींची उलाढाल !
शेतीशिवार टीम : 04 सप्टेंबर 2022 : आंबा म्हंटल की, तुमच्या -आमच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय ! जगात असं कोणीही नसेल की त्याला आंबा आवडत नसेल. परंतु हा आंबा आपल्याला वर्षभर चाखायला मिळत नाही. आंब्याचे शौकिनांना उन्हाळ्यात फक्त 3-4 महिने आंब्याच्या विविध जातींचा आस्वाद घेता येतो अन् दुःखी मनाने आंब्याच्या हंगामाला निरोप द्यावा लागतो.
पण जरा विचार करून पहा, अशा आंबाप्रेमींना वर्षातून तीनदा स्वादिष्ट आंबा खायला मिळाला तर ? होय… कोटा (राजस्थान) येथील गिरधरपुरा येथील 50 वर्षीय शेतकरी श्रीकिशन सुमन यांनी ‘एव्हरग्रीन मँगो’ (Evergreen Mango) या आंब्याची नवीन विविधता वाढवून हा चमत्कार केला आहे.
10 वर्ष अथक परिश्रम आणि संशोधन केल्यानंतर श्रीकिशन यांनी हिवाळ्यातही फळ देणाऱ्या आंब्याची जात तयार केली आहे, ज्यामध्ये या आंब्याला वर्षातून तीनदा आंब्याची फळे येतात. बाहेरून पिवळे आणि आतून केसरी रंगाचे हे आंबे रेशलेस म्हणजे तंतुमय किंवा बिना धाग्याचे आहेत. ज्याची चव खायला खूपचं चवदार लागते. या जातीच्या आंब्याची फळे आणि रोपे विकून श्रीकिशनजी वर्षाला 20 लाखांहून अधिक नफा कमवत आहे.
शेतकरी कुटुंबातून आलेले श्रीकिशन सुमन यांनी इयत्ता 11वीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. पण शिक्षणात मन न रमल्याने त्यांनी वडिलांसमवेत शेती केली. त्यांच्या वडिलांनी 12 एकर जमिनीवर पारंपारिक शेती करून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह केला.
कशी तयार केली, ही एव्हरग्रीन मँगोची जात :-
श्रीकिशनने आपल्या कौटुंबिक परंपरेनुसार सोयाबीन, तांदूळ, गहू इत्यादीपासून सुरुवात केली, परंतु त्यातून मिळणाऱ्या कमाईने श्रीकिशन समाधानी नव्हते. त्यामुळे त्यांनी रोजच्या रोज शेती करण्याचा विचार केला आणि भाजीपाला पिकवायला सुरुवात केली. मात्र भाजीपाल्यातील किडे व कीटकनाशकांमुळे नुकसान होत असल्याने त्यांनी तेही बंद केले.
श्रीकिशनजी ने यानंतर विविध प्रकारची फुलशेती सुरु केली, त्यांनी शेतात गुलाब, मोगरा, झेंडू, हजारे, नवरंगा इत्यादीं फुलांमधून जेमतेम कमाई तर केली पण त्यांनी एकाच गुलाबाच्या रोपाचे कलम करून सात प्रकारची फुले विकसित केले. पण फुलशेतीमुळे त्यांनाहवं तसं समाधानकारक परिणाम मिळत नव्हते.
त्यानंतर त्यांनी 1998 मध्ये आंब्याच्या रोपावर संशोधन सुरू केलं आणि ‘Evergreen Mango’ या आंब्याची नवीन जात वाढवली. श्रीकिशन बाजारातून विविध प्रतीचे आंबे विकत आणायचे आणि त्यांच्या शेतात पेरायचे आणि त्यातून उगवणाऱ्या रोपातून तीन-चार जाती कलम करून नवीन रोप तयार करायचे. मग असेच काहीतरी नवीन करत राहिले अन् चमत्कार घडला पाच वर्षांनी एका रोपावर ऑफ – सीझन बहार आला आणि थंडीतही तो मोहोर फळ देऊ लागला.
त्यांनी त्या झाडाला उत्तम दर्जाचे खत, पोषक तत्वे देऊन ते विकसित केली. सुमारे 10 वर्षांच्या संशोधनानंतर त्यांनी आंब्याचे हे रोप तयार केलं आणि त्याची कलम करून हजारो रोपे तयार केली.
किती किंमत आहे, या Evergreen आंब्याच्या रोपांची….
साधारणपणे आंब्याच्या झाडाला 2 वर्षातून एकदा फळे येतात, परंतु श्रीकिशन सुमन या जातीला वर्षातून तीनदा फळे येतात, म्हणून त्यांनी या जातीला ‘सदाबहार आंबा’ असं नाव दिलं आहे.
यानंतर, श्रीकिशनजी यांनी लखनऊ च्या फलोत्पादनाच्या केंद्रीय संस्थेकडे (ICAR) गेले. तेव्हा, 2012 मध्ये, फलोत्पादन विभाग, राजस्थानने त्यांच्या संशोधनाची तपासणी करण्यासाठी शास्त्रज्ञांची तीन सदस्यीय टीम तयार केली.
शास्त्रज्ञांनी पाने, डहाळ्या, मुळे, फुले आणि फळे यांच्या नमुन्यांची तपासणी केली तेव्हा श्रीकिशन यांनी शोधलेली आंब्याची जात जगापेक्षा पूर्णपणे वेगळी आणि नवीन असल्याचे पाहून शास्त्रज्ञही आश्चर्यचकित झाले.
वनस्पती जाती आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाने आंब्याच्या या नवीन जातीचे ‘एव्हरग्रीन’ नावाने पेटंट घेतले आणि त्याच्या शोधाचे श्रेय आणि बागायतीची मक्तेदारी सुमनला दिली आहे. 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रपती भवनाच्या मुघल गार्डनमध्ये त्यांच्या सदाहरित आंब्याचे प्रदर्शनही ठेवलं होतं.
श्रीकिशन वर्षाला एव्हरग्रीन मँगोची 2000 रोपे विकत आहे. 1.5 – 2 फूट उंचीची ही रोपे ते 17,00 रुपये, 3 फूट 3,000 रुपये आणि 4 फूट 4,000 रुपयांना विकत आहे. एव्हरग्रीन मँगोच्या जातीच्या वनस्पती 15 फुटांपर्यंत वाढते.
कशी आहे, एव्हरग्रीन मँगोची चव ?
आंबा प्रेमी आपल्या घरातील कुंडीतही ही रोपे लावून स्वादिष्ट आंब्याचा आनंद घेऊ शकतात. या जातीच्या आंब्याचे वजन 250 ते 350 ग्रॅम असते आणि एका झाडाला वर्षाला 100 ते 150 किलो फळे मिळतात. NIF बेंगळुरू लॅब टेस्टमध्ये या जातीच्या आंब्याची चव हापूस आंब्यासारखीच असल्याचे आढळून आलं आहे.
आज हे आंबे विकून श्रीकिशन चांगला नफा तर कमावत आहे, यासोबतच या जातीच्या नर्सरीतून त्यांना चांगले उत्पन्नही मिळत आहे. श्रीकिशन सुमन यांनी या आंब्याच्या व्यवसायातून गेल्या पाच वर्षांत 1 कोटी रुपयांपर्यंत कमाई केली आहे. या सदाबहार आंब्याच्या व्यवसायातून त्यांनी 25 एकर शेतजमीन आणि आलिशान घरही घेतलं आहे.
तुम्ही ही बागायतदार असाल अन् तुमचीही रोपे खरेदी करण्याची इच्छा असेल तर 7014269562 / 9829142509 या नंबरवर संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता…