शेतीशिवार टीम : 04 सप्टेंबर 2022 : टाटा समूहाचे (Tata Group) माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. रिपोर्टनुसार, सायरस मिस्त्री हे महाराष्ट्रातील पालघरमध्ये एका रस्ता अपघाताचे बळी ठरले ज्यात मिस्त्री यांचा मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूच्या वृत्ताला पालघर एसपींनी दुजोरा दिला आहे. मात्र सायरस मिस्त्री यांच्यासोबत आणखी कोण – कोण होते हे अद्याप स्पष्ट झालं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सायरस मिस्त्री आपल्या मर्सिडीज कारने अहमदाबादहून मुंबईला परतत होते. यादरम्यान पालघरजवळील चारोटी येथे त्यांची कार आली असता सूर्या नदीजवळ हा अपघात झाला.
या अपघातात आणखी दोन जण जखमी झाले आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एसपी म्हणाले की, कार डिव्हायडरला धडकल्यानंतर उलटल्याने 4 ते 5 वेळा कारने पलट्या मारल्या, त्यामुळे कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाले, तर सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला.
कोण होते सायरस मिस्त्री :-
सायरस मिस्त्री यांचा जन्म 4 जुलै 1968 रोजी एका भारतीय औद्योगिक घरात झाला होता. 2012 ते 2016 या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्षही होते. टाटा आडनाव नसलेल्या नौरोजी सकलातवाला यांच्यानंतर कंपनीचे ते दुसरे सीईओ (CEO) होते. कंपनीच्या संचालक मंडळाने मिस्त्री यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला होता.
मिस्त्री यांच्यानंतर रतन टाटा यांना पुन्हा एकदा कंपनीचे अंतरिम अध्यक्ष बनवण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे, टाटा सन्समध्ये सायरस मिस्त्री यांची 18.4% हिस्सेदारी आहे. 2018 च्या आकडेवारीनुसार, सायरसची एकूण संपत्ती $10 अब्ज होती, ते राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे सदस्य देखील होते.