अवैध रेती तस्करीला आळा बसावा यासाठी शासनाने नवीन धोरण आणले आहे. याद्वारे डेपोतून स्वस्त दरात वाळू मिळणे सुरु झाले आहे. शिवाय प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तसेच आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना यापुढ घरकुल बांधण्या साठी मोफत वाळू मिळणार आहे.
शासनाच्या या नवीन धोरणामळे लाभार्थ्यांना बांधकामाचा खर्च कमी होणार असल्यान त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, मात्र वाहतुकीचा खच लाभार्थ्यांना स्वतः करावा लागणार आहे. घरकुल बांधण्यासाठी रेती मिळत नसल्याने ज्यादा दरात गरिबांना रेती घ्यावी लागत होती, त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत होता तर रेती मिळत नसल्याने घरकुलाचे बांधकाम रखडले जायचे.
त्यामुळे घरकुलासाठी शासनाने रेती द्यावी अशी मागणी लाभार्थ्याकडून होत होती याची दखल घेत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घरकुल लाभार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत या नवीन वाळू धोरणात घरकुलासाठी मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. मोफत वाळू साठी सक्षम प्राधिकारी यांनी सादर केलेली यादी संबंधित तहसिलदार यांनी तपासून घेतल्यानंतर तहसीलदारांनी लेखी परवानगी दिल्यानंतर वाळू डेपोतून घरकुल लाभार्थ्यांना विनामुल्य वाळू उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. वाहतुकीचा खर्च लाभार्थ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे निश्चित घरकुल बांधकामाचा खर्च कमी होऊन लाभाथ्र्यांना दिलासा मिळणार आहे.
पूर्वी घरकुलासाठी मिळणारे अनुदान आणि प्रत्यक्षातील बांधकाम खर्च बांधण्यासाठीही यामध्ये मोठी तफावत असल्याने घरकुल लाभार्थ्यांना कर्जबाजारी व्हावे लागत होते, परंतु आता या नवीन धोरणामुळे लाभार्थ्यांना आपल्या घराचे स्वप्न साकार करणे सोपे जाणार आहे. शासनाच्या या नवीन धोरणाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.
शासनाच्या घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना रेती वाटप करण्याचा शुभारंभ लाखनी तालुक्यातील पळसगाव रेतीघाटावरून करण्यात आला. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वाती वाघाये यांच्या अध्यक्षतेखाली व पंचायत समिती लाखनीच्या सभापती प्रणाली सार्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत पळसगाव येथे हा कार्यक्रम घेण्यात आला.
या निमित्ताने भंडारा जिल्ह्यात घरकुल लाभार्थ्यांना रेती वाटप करण्याची सुरुवात गुरुवारी ( ता. 20) करण्यात आली ही प्रक्रिया जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, प्रकल्प संचालक विवेक बोंद्रे व उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार महेश शितोळे व गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव पार पाडत आहेत.
यावेळी महिला व बालकल्याण सभापती स्वाती वाघाये, लाखनी पं. स.चे सभापती प्रणाली सार्वे, जिल्हा परिषद सदस्या कुंभरे, कापसे, पंचायत समिती सदस्य सुरेश झंझाड, दादू खोब्रागडे, मते, झलके, ग्रामपंचायत पळसगावच्या सरपंच वैशाली सूर्यवंशी, उपसरपंच रवींद्र जवंजार, तहसीलदार महेश शितोळे,
गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, साहाय्यक गटविकास अधिकारी रोहिणी डोंगरे, नायब तहसीलदार उरकुडकर, तलाठी मेश्राम व ग्रामसेवक अमित सुटे उपस्थित हात घर बांधकामासाठी मोफत रेती उपलब्ध होणार असल्यामुळे व पावसाळा सुरू होण्यापूर्वीच घरकुलाचे काम पूर्ण करून घेणे शक्य झाल्यामुळे लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
पात्र लाभार्थ्यांना मिळणार पाच ब्रासपर्यंत वाळू..
घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना घराचे बांधकाम करण्यासाठी 5 ब्रासपर्यंत रेती देण्याचे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. या धोरणानुसार जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी 26 मार्च 2023 च्या पत्रान्वये लाभार्थ्यांना रेती देण्यासाठी लाखनी तालुक्यातील पळसगाव रेतीघाट निश्चित केला.
या रेतीघाटावरून घरकुल लाभार्थ्यांना घर बांधकामाच्या स्थितीनुसार पाच ब्रासपर्यंत रेती मोफत देण्यात येणार आहे. रेतीघाटावरून रेती नेण्याची जबाबदारी घरकुल लाभार्थ्याची राहणार आहे. या अनुषंगाने तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी दिले आहेत .
तालुका प्रशासनाचे अचूक नियोजन..
घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रासपर्यंत रेती मिळावी, यासाठी तालुका प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. लाखनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये घरकुल लाभार्थ्यांची मिटिंग घेऊन त्यांना रेती मिळण्यासाठीची कार्यपद्धती सांगितली जात आहे.
ऑनलाइन अर्ज कसा भरावा, याचे प्रशिक्षण सर्व ग्रामपंचायतीच्या संगणक परिचालकांना (ऑपरेटर) देण्यात आले आहे. वाहतूक परवाना देण्यासाठी पळसगाव रेतीघाटावर नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांची चमू राहणार आहे. यासाठी तहसील व पंचायत समिती कार्यालयात विशेष कक्षाची निर्मिती करण्यात आली असून धुर्वे, घरडे व शौर्य कंपनीचे प्रतिनिधी काम बघत आहेत.