मिनी ट्रॅक्टरसाठी नांदेड नंतर ‘या’ जिल्ह्याचे अर्ज सुरु, मिळवा 3,50,000 रु. अनुदान, ‘या’ ठिकाणी करा अर्ज..
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या विद्यमाने आणि सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्यामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांचा पुरवठा करणे ही योजना राबविण्यात येत आहे.
2022-23 या आर्थिक वर्षाकरीता राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असलेल्या आणि गटविकास अधिकारी कृषी अधिकारी किंवा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे नोंदवलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या पात्र बचत गटांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत 3 लाख 50 हजार रुपये जामा होतील. ही रक्कम मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी केल्यानंतर जमा करण्यात येते.
ट्रॅक्टर योजनेसाठी पात्रता :-
या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
बचत गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नव बौद्ध घटकातील असावेत.
मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मयार्दा 3 लाख 50 हजार रुपये इतकी राहील.
नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांनी कमाल मर्यादा रकमेच्या 10% हिस्सा स्वतः भरल्यानंतरच ते 90% शासकीय अनुदानास पात्र राहतील. जास्त अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल.
योजने अंतर्गत 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने जसे की, कल्टिव्हेटर, रोटव्हेटर किंवा ट्रेलर खरेदी करता येईल.
यासाठी स्वसहाय्यता बचतगटांना राष्ट्रीयकृत बॅंकेत बचत गटाच्या नावे खाते उघडून खात्याची माहिती देणं गरजेचं असणार आहे.
यामध्ये पहिल्या हप्त्याचे अनुदान ट्रॅक्टर आणि उपसाधनांची खरेदी करून पावती जमा केल्यानंतर दिलं जातं. तर उर्वरित RTO ची नोंदणी झाल्यानंतर 50% अनुदान दिलं जातं. यानंतर ट्रॅक्टरवर समाज कल्याण विभागाची पाटी लावणे बंधनकारक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र बचत गटांनी आवश्यक कागदपत्रांसहित विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, डॉ. बाबासाहेव आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी रस्ता, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर, येरवडा पुणे- 411015 येथे येत्या पंधरा दिवसाच्या आत प्रत्यक्ष सादर करावेत, अशी विनंती सहायक आयुक्त संगीता डावखर यांनी केलं आहे.