प्रत्येक जिल्ह्यातून किमान 75 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देणारी ‘शासकीय योजनांची जत्रा’ आज शनिवार, 15 एप्रिलपासून सुरू झाली आहे. ही अभिनव अशी जत्रा 15 जूनपर्यंत चालणार असून, त्यामध्ये संपूर्ण राज्यातून एकंदर 27 लाख लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात येणार आहे.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने उत्तम नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. ‘जत्रा शासकीय योजनांची, सर्वसामान्यांच्या विकासाची’ असे हे अभियान असून, त्याचे समन्वयन मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार आहे.

अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जनकल्याण कक्षदेखील स्थापन करण्यात येणार आहे. जनकल्याणाच्या अनेक योजना घोषित करण्यात येतात. मात्र, यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणे, योजनांची माहिती घेणे, आवश्यक दस्तावेज विविध कार्यालयांत जाऊन जमा करणे, हे कागदपत्र पुन्हा सादर करण्यासाठी कार्यालयाकडे येणे, अशा विविध प्रक्रियेतून जावे लागते.

दस्तावेज उपलब्ध करून देणारी ही कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांत जावे लागते. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी वारंवार त्या कार्यालयामध्ये जावे लागते.

कित्येक वेळा अनेक लोकांना त्यांना शासनाकडून देय असलेल्या योजनांची माहिती नसते आणि माहितीअभावी या योजनांचा लाभ गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे या योजनांचा उद्देश पूर्ण होत नाही

यावर यावर पर्याय म्हणून चाळीसगाव, जामनेर, मुरबाड, कल्याण आदी ठिकाणी ‘जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची’ नावाचा अभिनव व पथदर्शी उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमात एकाच ठिकाणी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कमीतकमी कालावधीत देण्यात आला आहे. आता राज्यभरात तो राबवण्यात येणार आहे.

या अभियानात नागरिकांना शासकीय योजनांशी निगडित कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तावेज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतील. जिल्हाधिकारी हे अभियानाचे जिल्हाप्रमुख असतील व इतर सर्व विभाग हे त्यांच्या समन्वयाने काम करतील या उपक्रमाची पूर्वतयारी 15 एप्रिल ते 15 मे २०२३ या कालावधीत करण्यात येईल.

या कालावधीत नागरिकांना विविध विभागांच्या योजनांची माहिती पोहोचवणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे तसेच त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात येतील.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट असेल. लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर / तालुका स्तरावर 2 दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. या अभियानाचा अहवाल जिल्हा जनकल्याण कक्षांना मुख्यमंत्री सचिवालयातील जनकल्याण कक्षास सादर करावा लागणार आहे.

या योजनांचा मिळणार लाभ..

सीमांत शेतकरी गटबांधणी व गटनोंदणी,
कृषी अभियांत्रिकीकरण योजना,
शेती किट, बाजार किट, फवारणी किट
इ – श्रम कार्ड
स्वनिधी योजना

इमारत बांधकाम योजना
रेशन कार्ड
आयुष्मान कार्ड
संजय गांधी व श्रावण बाळ योजना
ज्येष्ठ नागरिक कार्ड

जात प्रमाणपत्र , रहिवासी, उत्पन्न, जन्म व मृत्यू इत्यादी दाखले..
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
बचतगटांना लाभ
हेल्थ कार्ड
गाई , म्हशी व शेळी – मेंढी वाटप

महिलांना शिलाई मशीन वाटप
महालॅब योजना
रोजगार मेळावा
वीज जोडणी
माती परीक्षण

अण्णासाहेब पाटील व इतर महामंडळाच्या योजना ,
शिकाऊ चालक परवाना
दिव्यांग साहित्य वाटप
महिलांना सखी किट वाटप
डिजिटल इंडिया अंतर्गत शासनाच्या डिजिटल सुविधांची माहिती व प्रशिक्षण

कृषी प्रदर्शन
शेतकरी ते ग्राहक थेट बाजारपेठ
नवमतदार नोंदणी
मुलींना सायकल वाटप
मनरेगा

जि.प. व कृषी विभागाच्या घरकुल योजना
प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग
विवाह नोंदणी
पी . एम . किसान योजना

आधार कार्ड
पॅन कार्ड
पासपोर्ट
शासकीय कर्मचारी आस्थापना विषयक प्रलंबित बाबी व सेवानिवृत्तीविषयक लाभ
कृषी सेवा केंद्राचे परवाने इत्यादी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *