2020 साली राज्यात कोविड 19 मुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. या महामारीमध्ये अनेकांच्या घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंबाची वाताहत झाली आहे. अनेक कुटुंबे अजूनही या धक्क्यातून स्वतःला सावरू शकलेले नाहीत. यातील अनेक जण कोणत्या ना कोणत्या तरी बँकेचे कर्जदार होते त्यामुळे त्यांच्या संबंधित कुटुंबाला या गोष्टीची झळ बसल्याने आता हे कर्ज कसं फेडायचं हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे ठाकला होता.
या सर्व बाबींचा विचार करून सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेचे प्रमुख अनिल कवडे साहेब यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पत्र पाठवून जिल्ह्यातील कोविड – 19 मुळे निधन झालेल्या कर्जदारांच्या थकीत कर्जाची माहिती मागविली आहे. त्यामुळे अशा थकीत कर्जदारांचे कर्ज माफ होण्याची आशा निर्माण झाली आहे.
कोरोना महामारीने महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात हाहाकार माजविला होता. याची झळ जिल्ह्यालाही बसली आहे कोविड- 19 च्या परिणामांमुळे दोन वर्षात उद्भवलेल्या भयानक परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
कोरोना कालावधीमध्ये घरातील कर्त्या पुरुषांचे निधन झाल्याने अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अश्या परिस्थितीमध्ये कुटुंबांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
यामुळे मयत कर्जदारांचे राहते घर किंवा इतर मालमत्ता तारण ठेवलेले असल्यास अश्या अडचणीच्या काळात त्या कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे. अश्या कुटुंबांचा शोध घेऊन त्यांची माहिती गोळा करण्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व उपनिबंधक कार्यालयाला आदेश :-
तसेच कोरोना संक्रमणाच्या कालावधीत कोरोनामुळे निधन झालेल्या व मालमत्ता तारण असलेल्या आपल्या विभागातील, जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती बँका व नागरी सहकारी पतसंस्थामधील सर्व थकीत कर्जदारांची माहितीही सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी मागितली आहे. तसेच हे पत्र विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना देखील पाठवण्यात आले आहे.
सबब प्रामुख्याने मागील कोरोना संक्रमणाचे कालावधीतील कोविड -19 मुळे निधन झालेल्या व मालमत्ता तारण असलेल्या आपले विभागातील / जिल्हयातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका, नागरी सहकारी बँका, व नागरी सहकारी पतसंस्थांमधील थकीत कर्जदारांची खालील नमुन्यातील माहिती लवकरात लवकर प्राधान्याने या कार्यालयास comm.urban@gmail.com या e – mail वर सादर soft copy सह सादर करण्यात यावी असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे.