CDS Bipin Rawat Chopper Crash : ब्लॅक बॉक्समधून उघड होणार रहस्य ? जाणून घ्या Black box कसं करतं काम…
शेतीशिवार टीम, 11 डिसेंबर 2021 : तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात CDS जनरल बिपिन रावत यांच्यासह 13 लष्करी जवान शहीद झाले. देशाच्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची (CDS) सुरक्षा अत्यंत कडक असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याच्यासोबत नेहमीच अनेक कमांडो असायचे. ते नेहमी देशातील सर्वात फुलप्रूफ हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करत असे. अशा परिस्थितीत असा प्रश्न उपस्थित होतो की,CDS हेलिकॉप्टरचा अपघात नेमका झाला कसा ?
दुर्घटनेची जी काही कारणे सांगितली जात आहेत, ती खराब हवामान आणि शंका – कुशंका बद्दल आहेत.त्यामुळे ब्लॅक बॉक्स (Black box) आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरची (Cockpit voice recorder) तपासणी केल्यावर याचं खरं कारण समोर येणार आहे.
या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे हवाई दलाने सांगितले. आज आपण या अपघाताच्या तपास प्रक्रियेबद्दल जाणून घेऊ…
हवाई अपघातांचा कोण करतो तपास…
उड्डाण सुरक्षा (Flight safety) आणि अपघात तपासणी (accident investigation) या बाबतीत भारतीय हवाई दलाची सेवा सर्वोत्तम आहे. या सर्व्हिससाठी त्यांचे हवाई अपघात तपास मंडळ आहे. कोणत्याही अपघाताची चौकशी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असलेल्या स्वतंत्र कोर्ट ऑफ इन्क्वायरीद्वारे ( independent Court of Inquiry (COI)) केली जाते. एअर कमोडोर किंवा त्याहून अधिक दर्जाचा वरिष्ठ हेलिकॉप्टर पायलट सीओआयचा प्रमुख असतो. कोणत्याही विमान अपघाताची चार महिन्यांच्या आत चौकशी करावी लागते.
ब्लॅक बॉक्स (Black box) नेमका काय असतो, त्यावरून तपासात काय होते मदत…
कोणत्याही हवाई अपघातानंतर ब्लॅक बॉक्स (Black box) शोधणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ब्लॅक बॉक्स हे एक इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डिंग डिव्हाईस आहे जे अपघातांच्या तपासात सुलभतेच्या उद्देशाने विमानात ठेवलं जातं. यामध्ये अनेक प्रकारचे सिग्नल, संभाषण आणि तांत्रिक डेटा रेकॉर्ड केला जातो.
ब्लॅक बॉक्सला फ्लाइट रेकॉर्डर म्हणूनही ओळखलं जातं. हा बॉक्स सहसा ऑरेंज रंगाचा असतो. ब्लॅक बॉक्स इतका मजबूत असतो की, मोठ्या अपघातातही तो जमिनीवर, आकाशात किंवा समुद्राच्या खोलवरही सुरक्षित राहू शकतो. तो समुद्राच्या खर्या पाण्यातही वर्षानुवर्षे न कुजता टिकू शकतो. हा ब्लॅक बॉक्स बीकन बॅटरीने चालतो. जो पाच वर्षांपर्यंत डिस्चार्ज होत नाही.