केरळमध्ये मान्सूनचे उशिरा आगमन (Monsoon 2023 Forecast) यामुळे सर्वत्र विलंब झाला आहे. परंतु, मान्सूनने वेग घेतला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. गेल्या 15 दिवसांपासून मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे.
कारण, आता मान्सून सक्रिय झाला आहे. दरवर्षी 7 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो. मात्र, यंदा तो 11 जूनपासून लांबणीवर पडला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनची प्रगती थांबली होती. पण, आता मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून येत्या दोन दिवसांत मान्सून राज्यात दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. येत्या 4 आठवड्यांत महाराष्ट्राच्या विबिध भागांसह देशभरात पाऊस पडेल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.
येत्या 3 – 4 दिवसांत मान्सूनचा जोर वाढणार..
भारतीय हवामान विभागाचे (IMD) पुणे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील काही भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. पुढील 3-4 दिवसांत महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाच्या इतर भागांमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सुरू राहण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळेच येत्या तीन ते चार दिवसांत मान्सूनचा जोर वाढणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
मान्सून कसा राहणार..
दरम्यान, केरळमधून मान्सून पुढे सरकू लागला आहे. मान्सूनने आता कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा बहुतांश भाग व्यापला आहे. एवढेच नाही तर मान्सूनने महाराष्ट्रातील विदर्भ आणि ओडिशा, छत्तीसगडच्या काही भागातही प्रवेश केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मान्सून झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागातही येत्या 2 दिवसांत पोहचणार आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस
आज विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. यंदा मान्सून लांबल्याने बळीराजाही चिंतेत होता. मात्र, विदर्भात मान्सूनच्या पहिल्याच पावसाने शेतकरी सुखावला आहे. पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांतही पाऊस पडत असल्याचे वृत्त आहे.
आज कोणत्या शहरात पाऊस पडला ?
मुंबईसह उपनगरे, ठाणे, नवी मुंबई या महत्त्वाच्या शहरांमध्ये आज मुसळधार पाऊस झाला. कल्याण – डोंबिवलीसह पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस झाला. अंबरनाथमध्येही पावसाला सुरुवात झाली. सकाळपासून ढगाळ वातावरण असून उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागात अचानक पाऊस सुरू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला..