पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आकुड़ी व पिंपरीतील उद्यमनगर येथील गृहप्रकल्पातील सदनिकांचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी या दोन्ही प्रकल्पातील एकूण 1 हजार 138 सदनिकांसाठी महापालिकेने अर्ज मागविले आहेत. येत्या 28 जूनपासून ही अर्जप्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी 10 हजार अनामत रक्कम व 500 रूपये नोंदणी शुल्क अर्जदारांना जमा करावे लागणार आहे.
रस्ते आरक्षणामध्ये बाधित झालेल्या नागरिकांसाठी आकुर्डी व उद्यमनगर येथील गृहप्रकल्प राखीव ठेवण्यात आले होते. आकुर्डीत 568 सदनिका आणि उद्यमनगरात 370 सदनिका बांधून तयार आहेत.
या सदनिकांसाठी 28 जून ते 28 जुलै 2023 या कालावधीत https://pcmc.pmay.org या संकेतस्थळावर लाभाथ्यांना सर्व कागदपत्रासह ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत . पिंपरीतील सदनिकेसाठी पात्र लाभार्थ्यांस 7 लाख 92 हजार 699 रूपये आणि आकुर्डीतील सदनिकेसाठी पात्र लाभार्थ्यास 7 लाख 35 हजार 255 रूपये स्वहिस्सा भरावा लागणार आहेत.
केंद्र शासन 1 लाख 50 हजार आणि राज्य शासन 1 लाख रूपये हिस्सा देणार आहे. दोन्ही प्रकल्पातील सदनिकांमध्ये दिव्यांग (5 टक्के), सर्वसाधारण खुला गट (50 टक्के), अनुसूचित जाती (एससी) (13 टक्के), असुसूचित जमाती (एसटी) (7 टक्के) आणि इतर मागास वर्ग (ओबीसी) (30) टक्के ) असे आरक्षण ठेवण्यात आले आहे. यापूर्वी प्रकल्पास अर्ज केलेले व सदनिका न मिळालेले नागरिक या प्रकल्पासाठी अर्ज करू शकतात.यादीत नाव न आल्यास 10 हजार रूपये परत केले जाणार आहेत.
सदनिकेसाठी महत्वाच्या अटी..
अर्जदार हा पिंपरी – चिंचवड शहराचा रहिवाशी हवा .
अर्जदारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपर्यंत हवे .
अर्जदार व त्यांच्या कुटुंबाच्या नावे भारतात घर किंवा मिळकत नसावे.
आरक्षणातील सदनिकेसाठी जातीचा दाखला बंधनकारक
आवश्यक कागदपत्रे :-
उत्पन्न दाखला, तहसीलदार यांचे स्वाक्षरीने (सन 2022-23 आर्थिक वर्ष) किंवा 1 वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR किंवा फॉर्म 16/16 अ (सन 2022 -23 आर्थिक वर्ष)
जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती, जमाती, वि.जा.भ.ज. इतर मागासवर्गीय) (फक्त अर्जदाराचे कुटुंबातील इतर सदस्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही) फक्त महाराष्ट्रातील रहिवासी
जात वैधता प्रमाणपत्र फक्त अजंदाराचे (उपलब्ध असल्यास)
आधार कार्ड (अजंदार व कुटुंबातील सर्व सदस्यांचे)
पॅनकार्ड (अर्जदार व सह अर्जदार)
बैंक पासबुक (अर्जदार) पासबुक खाते तपशील पृष्ठ व रद्द केलेला चेक
मतदान ओळखपत्र (अर्जदार)
भाडे करार (नोंदणीकृत / नोटरी – किमान रक्कम ₹ 500 /- च्या स्टॅम्प पेपरवर)
संमतीपत्र (नातेवाईकांकडे राहत असल्यास त्यांचे रु.100 च्या स्टॅम्प पेपरवरील संमतीपत्र)
वीजविल ( चालू महिन्याच्या राहत्या पत्त्यावरील)
आदीवासी प्रमाणपत्र (डोमॉसाईल दाखल) – फक्त महाराष्ट्रातील रहिवासी )
PCMC – पंतप्रधान आवाससाठी अर्ज जाहिरात :- pcmcindia.gov.in
अर्ज करण्यासाठी लिंक दि.28 जून 2023 पासून सुरु होणार – https://pcmc.pmay.org/
अनामत रक्कमेत दुप्पट वाढ
महापालिकेने अर्जासोबत 10 हजार रूपये अनामत रक्कम व 500 रूपये नोंदणी शुल्क असे एकूण 10 हजार 500 रूपये ऑनलाइन भरावे लागणार असल्याचे म्हटले आहे. परंतु, यापूर्वीच चऱ्होली, रावेत, बोऱ्हाडेवाडी प्रकल्पासाठी अर्ज भरताना फक्त 5 हजार रुपये अनामत रक्कम घेतली होती. यावेळी ही रक्कम दुप्पट करून थेट 10 हजार रुपये अनामत रक्कम घेण्याची भूमिका पालिकेने घेतली आहे.
राज्य शासनाच्या मंजुरीविनाच अर्जप्रक्रिया..
आकुर्डी, पिंपरीतील गृहप्रकल्प तयार होऊन वर्ष उलटले आहे. परंतु, वारंवार आवाहन करूनही रस्ते बाधित नागरिक लाभार्थी यांचा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पाच्या प्रयोजनात बदल करून पंतप्रधान आवास योजनेतील नागरिकांना सदनिका वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रयोजनात बदल करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु अद्याप तो शासनाच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. मंजुरी मिळालेली नसताना पालिकेने अर्जप्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.