शेतीशिवार टीम, 19 जानेवारी 2022 : संपुर्ण राज्यात गाजलेल्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला चारीमुंड्या चित केले.
आघाडीने तब्बल 15 जागांवर विजय संपादन केला. कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला 12 जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेसला 3 तर भाजपला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले. कर्जत नगरपंचायतच्या 17 जागांसाठी आज मतमोजणी पार पडली. सकाळी 10 वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून ही निवडणूक रोहित पवारांची प्रतिष्ठेची तर भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्यासाठी अस्तित्वाची झाली
या कर्जत नगरपंचायत निवडणूकीत आधीच 13 प्रभागांसाठी मतदान झालं असून ओबीसी आरक्षणामुळे उर्वरित 4 प्रभागात दि.18 रोजी (मंगळवारी) शांततेत मतदान पार पडतं झालेल्या चार जागांवर 87% मतदान झालं आहे.
यामध्ये गायकरवाडी प्रभागात 673 मतदारांपैकी 656 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नेवसे मळा, ढेरेमळा, समुद्रमळा या प्रभागात 1127 मतदारांपैकी 979 मतदारांनी मतदान केले. पोस्ट ऑफिस प्रभागात 734 मतदारांपैकी 622 मतदारांनी मतदान केले तर बुवासाहेबनगर प्रभागात 786 मतदारांपैकी 633 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
कर्जत नगरपंचायत निवडणूकीत दोन टप्प्यात मतदान झाले. दोन्ही टप्प्यात मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान केले. आज बुधवारी सकाळी सकाळी दहा वाजता कर्जत तहसील कार्यालयात मतमोजणी सुरु झाली आहे.
आठ टेबलद्वारे मतमोजणीच्या तीन फेऱ्याद्वारे मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरबोले व तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली. मतमोजणीकडे सर्व उमेदवारांसह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. कर्जतकर नेमका कोणाला कौल देणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.