वाढत्या महागाई, कांद्याचे पडते दर यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आपल्या शेतातचं कांदा साठवतात. लोखंड व स्टील यांचे प्रचंड प्रमाणात भाव वाढ झाल्यामुळे आधीच कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असल्याने लोखंडी कांदा चाळ उभारू शकत नाहीत. त्यामुळे कुडाची पारंपारिक कांदा बराख करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असतो.
सध्या राज्यभर कांदा उत्पादक शेतकरी कांदा साठवणुकीसाठी जुन्या पद्धतीच्या कुडाच्या आरणी तयार करून त्यामध्ये कांदा साठवणूक केली जात आहे. आत्तापर्यंत या आरणी तयार करण्यासाठी बाजरीचे सरमाड, पाचट बांबू, प्लास्टिक ताडपत्री यांचा वापर करत आले. परंतु कांदा हे एक जिवंत असल्याने त्याचे मंदपणे श्वसन चालू असते.
तसेच पाण्याचे उत्सर्जन देखील होत असते. त्यामुळे योग्य प्रकारे साठवण न केल्यास कांद्याला 45-60 टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. हे नुकसान प्रामुख्याने वजनातील घट, कांद्याची सड व कोंब येणे इ. कारणांमुळे होते. यासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य्यही मिळत आहे.
महाराष्ट्र शासन मार्फत राष्ट्रीय कृषी योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाकडून सध्या कांदा चाळीसाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य म्हणून 5, 10, 15, 20 व 25 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के व कमाल 3,500 रुपये प्रति मेट्रिक टन या क्षमतेनुसार अर्थसहाय्य दिले जातं होतं. हे अनुदान अतिशय तुटपुंजे आहे तरी शासनाने हे अनुदान वाढवून द्यावे अशी शेतकऱ्यांनी मागणी केली होती.
आता या मागणीचं फळ शेतकऱ्यांना मिळालं आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कांदे साठवण करण्याचे गोदाम म्हणून कांदाचाळ उभारण्यासाठी 1 लाख 60 हजार 367 रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले आहे त्यामुळे कांडा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अकुशल 60 टक्के प्रमाणे 96 हजार 220 रुपये इतकी मजुरी तसेच साहित्यासाठी लागणारा खर्च, कुशल 40 टक्केच्या मर्यादेत 64 हजार 147 रुपये इतका खर्च असा मनरेगा अंतर्गत मजुरी अधिक साहित्याचा खर्च एकूण 1 लाख 60 हजार 367 रूपये इतके अनुदान मिळणार आहे.
उर्वरित रक्कम 2 लाख 98 हजार 363 रुपये इतका निधी लोकवाटाच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून कांदाचाळीसाठी एकूण खर्च – 4 लाख 58 हजार 730 रुपये येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गटशेती, महिला बचत गट यांना सामुदायिक घेता येणार लाभ ..
खरीप व रब्बी हंगामामध्ये कांदा पिकाचे उत्पादन होते. राज्यात साधारण 136.68 लाख मे. टन इतक्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. त्यासाठी साधारणपणे एकूण 9.45 लाख हे. क्षेत्र कांदा पिकाखाली आहे.
कांदा साठवण करण्याच्या गोदामासाठी रुंदी 3.90 मी. लांबी 12.00 मी. एकूण उंची – 2.95 मी. (जमिनीपासून ते टाय लेवलपर्यंत) याप्रमाणे आकारमाण राहील. साधारण एक हे. धारण क्षेत्रावर 25 मे. टन कांदा उत्पादन होते. कांदाचाळ वैयक्तिक तसेच सामुदायिकरित्या शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात. तसेच गटशेती, महिला बचत गट यांना सामुदायिक लाभ घेता येणार आहे.