शेतीशिवार टीम : 17 सप्टेंबर 2022 : राजस्थान, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये लम्पी व्हायरसचा कहर वाढला आहे. आत्तापर्यंत लम्पी व्हायरसने (lumpy skin disease) लाखो जनावरांना ग्रासलं आहे. लम्पी विषाणूमुळे हजारो गायींचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही लम्पी विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून त्याचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यासह, नगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी, सोलापूर, वाशीम व नाशिक या 19 जिल्ह्यांत 218 गावांमध्ये ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव दिसून आला असून या विषाणूमुळे अनेक जनावरे मरण पावली आहेत.
हा संसर्ग झपाट्याने पसरत असून जनावरांना मारत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात या आजाराची लागण झालेल्या गायींची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव झालेल्या जनावरांना पुरळ व ताप येतो व ते हळूहळू अशक्त होऊन वेळीच उपचार न मिळाल्यास जनावरे मरण पावत आहे.
या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून राज्यातील उद्भवलेला लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी करावयाच्या आवश्यक त्या उपाययोजना याबाबत मंत्रीमंडळ बैठकीत मंत्रिमंडळास वस्तुस्थिती अवगत करण्यात आलेली आहे.
लम्पी चर्मरोग प्रादुर्भावामुळे ज्या शेतकरी / पशुपालकांच्या पशुधनाचा मृत्यू झालेला आहे अशा शेतकरी / पशुपालकांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी धोरणामधील निकषाप्रमाणे 100% राज्य शासनाचे अर्थसहाय्य देण्याबाबत तसेच सदर बाबीची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे मंत्रिमंडळाने निर्देश देण्यात आले आहे.
त्याचबरोबर, राज्यात गोवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेला विषाणूजन्य व सांसर्गिक लम्पी चर्मरोग प्रादुर्भावामुळे ज्या शेतकरी / पशुपालक यांच्या पशुधनाचा मृत्यू झालेला आहे, अशा शेतकरी / पशुपालक यांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी धोरणामधील राज्य शासनाच्या निधीतून खालीलप्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात आली आहे.
मृत पावलेल्या पशुधनाचा प्रकार | अर्थसहाय्याची रक्कम (प्रति जनावर) | अर्थसहाय्याची प्रति कुटुंब मर्यादा |
---|---|---|
दुधाळ जनावरे गाय व म्हैस | रु. 30,000 /- | 3 मोठी दुधाळ जनावरे (पर्यंत) |
ओढकाम करणारी जनावरे (बैल) | रु. 25,000 /- | 3 ओढकाम करणारी मोठी जनावरे (पर्यंत) |
वासरू | रु. 16,000 /- | 6 ओढकाम करणारी लहान जनावरे (पर्यंत) |