Maharashtra: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नववर्षाचं मोठं गिफ्ट, DA मध्ये 4% ने वाढ, तर मूळ पगारातही होणार घसघशीत वाढ, पहा कॅल्क्युलेशन..
नवीन वर्षाची सुरुवात होताच, महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना एक नव्हे तर दोन – दोन गिफ्ट मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. यानंतर त्यांना मिळणारा महागाई भत्ता (DA) 34 टक्क्यांवरून 38% पर्यंत पोहचला आहे त्यामुळे त्याच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.
तसेच दुसरी गुड न्यूज म्हणजे राज्य वेतन सुधारणा समितीचा (बक्षी समिती) अहवाल स्वीकारण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. या निर्णयामुळे अनेक संवर्गाच्या वेतन त्रुटी दूर होणार असून त्याचा लाभ अधिकारी व कर्मचाऱ्यांना होणार आहे. शासनावर यामुळे 240 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असून सुधारित वेतनस्तर जानेवारी 2016 पासून अंमलात येणार आहे.
शासन आदेश निघाल्याच्या महिन्यापासून हे आर्थिक लाभ देण्याचेही यावेळी ठरवण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात सहाव्या वेतन आयोगातील त्रुटींबाबत तसेच सातव्या वेतन आयोगातील सुधारित वेतन संरचनेतील वेतनवाढीच्या मागण्यांबाबत बक्षी समितीने सादर केलेला अहवाल स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार राज्य शासकीय व इतर कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेत सुधारणा करण्याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मागणी होती . त्यानुसार 17 जानेवारी 2017 रोजी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती नेमण्यात आली होती.
या समितीने अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून आलेल्या 3 हजार 739 मागण्यांवर विचारविमर्श करून 5 डिसेंबर 2018 रोजी आपल्या अहवालाचा खंड 1 शासनास सादर केला होता. त्याची अंमलबजावणीही झाली. मूळ अहवालाचा दुसरा खंड 8 फेब्रुवारी 2021 रोजी सादर करण्यात आला होता, तो राज्य शासनाने स्वीकारला.
38% महागाई भत्ता (DA) झाल्याने पगारात किती होणार वाढ..
राज्य सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील 16 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. आतापर्यंत कर्मचाऱ्यांना 34% महागाई भत्ता दिला जात होता, तो आता 38% झाला आहे. ही वाढ शासन निर्णय जुलै 2022 पासून 1 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील वाढीनुसार देण्यात येणार आहे. ही वाढ 1 जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीतील थकबाकीसह जानेवारी 2023 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.
पगारात किती होणार वाढ, पहा कॅल्क्युलेशन..
महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाल्याने आता कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18,000 रुपये धरलं तर त्याच्या पगारात वार्षिक वाढ 6840 रुपये होणार आहे. या आधी 34% महागाई भत्ता मिळत होता त्यामुळे कर्मचाऱ्यांना 34% महागाई भत्त्यानुसार 6120 प्रति महिना मिळत होता.
मात्र, नवीन महागाई भत्ता 38% लागू झाल्यानंतर ही रक्कम 6840 प्रति महिना होणार आहे. याचा अर्थ दरमहिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारात 720 रुपये वाढतील. यानुसार त्याच्या वार्षिक पगारात 8640 रुपयांची भरघोस वाढ होणार आहे.