Pune Solapur National Highway : महामार्गालगत ‘या’ 3 ठिकाणी होणार अंडरपास, NHAI कडून मंजुरी, डॉ. अमोल कोल्हे यांचा पाठपुरावा यशस्वी..
हवेली तालुक्यातील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग 65 वरील उरुळी कांचन, थेऊर फाटा आणि लोणी काळभोर येथे अंडरपास (व्हीयूपी) बांधण्याच्या कामाला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली असून , सातत्याने अपघात होणारी जंक्शन्स सुरक्षित करण्याच्या खासदार डॉ . अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अलीकडच्या काळात सातत्याने अपघात होत आहेत . या अपघातांत अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून , अनेकांना अपंगत्व पतकारावे लागले आहे. तर या महामार्गावर अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत.
त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला होता. या असंतोषाची दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान एलिव्हेटेड रस्ता बांधण्याची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.
मात्र, त्यासाठी बराच विलंब लागणार असल्याने खासदार डॉ. कोल्हे यांनी किमान महत्त्वाची जंक्शन सुरक्षित करण्याची सूचना केली होती. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या सूचनेची दखल घेऊन उरुळी कांचन (कि.मी. 28 / 910), लोणी (कि.मी. 17 / 500) आणि थेऊर फाटा ( कि.मी. 20/280 ) या ठिकाणी अंडरपास बांधण्याच्या कामाला मंजुरी दिली आहे.
त्यामुळे पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहनचालकांचा प्रवास सुरक्षित होईल. त्याचबरोबर स्थानिक नागरिक, पादचारी यांनाही सुरक्षितता मिळेल. नागरिकांची व वाहनचालकांची सुरक्षितता व होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मुक्त होणे हा प्राधान्याचा विषय असून, या तीनही अंडरपासमुळे अपघातांवर व वाहतूक कोंडीवर नियंत्रण येऊ शकेल. आता हे तीनही अंडरपास लवकर व्हावेत यासाठी माझा पाठपुरावा सुरूच राहणार आहे. व लवकरात लवकर होण्यासाठी माझा प्रयत्न राहील.
डॉ. अमोल कोल्हे, खासदार, शिरूर हवेली