जमिनींच्या नकाशांचे जीर्ण झालेला कागद, त्यावरील अस्पष्ट दिसणारे क्रमांक, नीट हाताळला गेला नाही तर फाटला जाण्याची शक्यता अश्या अनेक समस्या प्रशासनाला आणि सामान्य नागरिकांनाही सतावत आहेत. मात्र ही चिंता आता जास्त दिवस राहणार नाही. लवकरच असे पारंपरिक पद्धतीचे राज्यातील सर्व प्रॉपर्टी कार्ड आणि सातबारा क्रमांकाचे नकाशे आता ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 

यामध्ये राज्यातील 28 जिल्ह्यांतील भूमापन पद्धतीने जमिनीच्या नकाशांचे डिजिटलायजेशन करण्यात येणार आहे. त्याकरिता 16 डिसेंबर 2022 रोजी महसूल विभागाने सुकाणू समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या आपल्याला सातबारा उतारे आणि प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन पद्धतीने मिळू शकतात. ऑक्टोबर 2015 मध्ये सातबारा उतारे आणि प्रॉपर्टी कार्ड बरोबर त्या जागेचा नकाशाही ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला गेला होता. त्यानुसार नोव्हेंबर 2016 पासून 8 जिल्ह्यांत पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता.

त्याच्या यशस्वी प्रयोगानंतर राज्यातील उर्वरित 28 जिल्ह्यांत तो राबविण्यात येणार आहे. बंगळूर येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स या सरकारी संस्थेस हे काम देण्यात आलं आहे. याकरिता प्रत्येक जिल्ह्यात सुकाणू समिती स्थापन केली जाणार आहे.

राज्यात असलेल्या प्रत्येक जागेचे सध्या ब्रिटिशकालीन नकाशे उपलबद्ध आहेत. राज्यात 1939 साली झालेल्या जमिनीच्या मोजणीनंतर हवं सर्व नकाशे तयार करण्यात आले होते. कागदावर असणारे हे नकाशे आता जीर्ण झाले असून, त्यांचे आयुष्य संपत आले आहे. त्यातही आग, पाऊस, भूकंप आदींसह मानवी चुकांमुळे हे रेकॉर्ड नष्ट होण्याचीही भीती आहेच. त्यामुळे या नकाशांचे डिजिटलायजेशन केले जाणार असल्याने हे सर्व रेकॉर्ड कायमस्वरूपी जतन करता येणार आहे.

जगाच्या नकाशावर दिसणार जमीन :-

सदर डिजिटल नकाशे हे अक्षांश – रेखांशा नुसार तयार होणार आहेत. त्यामुळे जगाच्या नकाशावरही तुमची नेमकी जमीन कोठे आहे, ती कशी दिसते हे सहजपणे कळणार आहे. याप्रकारे नकाशे तयार केल्यामुळे जमिनीच्या हद्दी कायमस्वरूपी स्पष्ट होतील.

प्रशासनाला तर याचा फायदा होणार आहेच, मात्र नागरिकांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. हे काम एकूण तीन टप्प्यांत चालणार आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा दुसर्‍या टप्प्यात समावेश झाला आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असे सुदाम जाधव, अधीक्षक, भूमी अभिलेख, कोल्हापूर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नकाशांचा काय होणार फायदा ?

दिवसेंनदिवस वाढत चाललेले जमिनीच्या हद्दीचा वाद मिटणार..

ड्रोन, रोव्हर्सद्वारे सर्वेक्षण झालेल्या गावांमधील जमिनीचे अक्षांश-रेखांश मिळणार..

अक्षांश-रेखांशांसह जमिनीचे डिजिटल नकाशे उपलब्ध होणार.

महाराष्ट्रातील जमीन सर्वेक्षण नकाशा ऑनलाइन : भू नक्ष कसा तपासायचा ?

स्टेप 1: महाभू नकाशा https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/bhunaksha/27/index.jsp या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

स्टेप 2 : भू – नकाशा महाराष्ट्रावर ग्रामीण असो वा शहरी तुमच्या जमिनीची निवड करा. आणि नंतर जिल्हा, सीटीएसओ, विभाग, नकाशा प्रकार इत्यादी निवडा. तुम्ही महाभू नक्षावर थेट ‘प्लॉट नंबरद्वारे शोधा’ या ऑप्शनचा देखील वापर करून पुढे जाऊ शकता.

स्टेप 3 : याद्वारे तुम्ही प्रॉपर्टी कार्ड आणि प्लॉट रिपोर्ट पाहण्याचा पर्याय देखील निवडू शकता. भू नकाशा महाराष्ट्र ऑनलाइन प्रॉपर्टी कार्डमध्ये तुम्ही रस्त्याचे नाव, मोहल्ला, कॅडस्ट्रल सर्व्हे इत्यादी पाहू शकता..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *