कांद्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणले आहे. सध्या कांद्याचे बाजारभाव अत्यंत खाली घसरले असून आजमितीला कांदा 8 ते 13 रु. प्रतिकिलो या भावाने विकला जात आहे. सध्या कांद्याचे बाजारभाव स्थिर आहेत. त्यामुळे बाजारातील शेतकऱ्यांनी केलेला खर्चही भरून निघत नाही, अशीच चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे. याशिवाय परराज्यातून कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने भविष्यात कांद्याची किंमत वाढणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये शंका निर्माण झाली आहे.
सध्या कांद्याचे बाजारभाव घसरले असून, ते आठ ते तेरा रुपये किलोने विकले जात आहे. त्यामुळे कांद्याच्या एका गोणीचे शेतकऱ्यांना प्रति बॅग पाचशे ते सहाशे रुपये मिळतात. या वर्षी कांद्याचा भांडवली खर्च काढला असता, शेतकर्यांना काहीही शिल्लक न राहिल्याने इतके दिवस कष्ट करून काय फायदा असा सूर शेतकऱ्यांकडून आळवला जात आहे. येथील कांद्याची विक्री कवडीमोल बाजार भावाने होत असल्याने, बळीराजाच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत.
यावर्षी अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेवटी झालेल्या कांद्याला यंदा चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने तो चाळीमध्ये साठवून ठेवला. मात्र चाळीतला कांदा संपत आला तरी कांद्याला बाजार काही सापडत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
भांडवली खर्चाअभावी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
भविष्यात देखील कांद्याचे भाव वाढणार नाहीत असेच चित्र दिसत आहे, पुढील वर्षातील आर्थिक धोरणांचे गणित शेतकऱ्यांना चुकवावे लागणार आहे. याची खात्री शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. सध्या ज्या शेतकऱ्यांचा कांदा विक्रीसाठी पाठवण्यात आला आहे, त्यातून केवळ वाहतुकीचाच खर्च निघत आहे. यामुळे हातात अक्षरशः शून्य रुपयांची पट्टी येत असल्याने शेतकरी वर्ग संतप्त झाला आहे.
कांद्याला भाव सतरा ते वीस रुपये असलाच पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना किमान भांडवली खर्च जाता थोडेफार पैसे शिल्लक राहतील. मात्र सध्या तरी कांदा शेतकऱ्यांना रडवतानाच दिसत आहे. शेतकऱ्यांनी कांद्याला भाव नसल्याने मोठ्या प्रमाणावर चाळीत साठवून ठेवला होता. काहींनी तर कांद्याची लागवड कमी केली होती त्यामुळे अश्या लोकांनी कांदा विकत घेऊन साठवून ठेवला होता.मात्र त्या लोकांचाही भ्रमनिरास झाल्याचे दिसून येत आहे.
परराज्यातून नवीन कांदा बाजारात दाखल झाल्याने जुन्या कांद्याची मागणी घटली आहे. ग्राहकांकडून नवीन कांद्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे जुन्या कांद्याचे दर घसरले असून, सध्याचे दर देखील स्थिर राहण्याची शक्यता दिसत नाही. सध्या बाजारभाव कमी होण्याची चिन्हे व्यापारी वर्गाच्या बोलण्यावरून समोर येत आहेत.