देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेने तीव्र स्वरूप धारण केले असतानाच महाराष्ट्रात मात्र हवामानाचा संमिश्र परिणाम दिसून येत आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला तर अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. दरम्यान, आज अन् उद्या वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील 2 दिवस मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम, सांगली आणि सोलापूरमध्ये पावसाची शक्यता असून हवामान खात्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

सोमवारी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. राज्यात तापमान वाढत असतानाच काही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसला आहे. फळबागा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अजून 2 दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे.

आज, कोकण गोव्यात पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच, हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. यानंतर 18 तारखेला विविध ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील दोन दिवस मराठवाड्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर 17 एप्रिलला हवामान कोरडे राहील. 18 तारखेनंतर तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आज विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र, 19 तारखेनंतर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे..

ठाण्यात उष्णतेची लाट..

15 आणि 16 तारखेला ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. याशिवाय धाराशिव, अकोला, अमरावती आणि बुलढाणा, वाशीम येथे विविध ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय 16 आणि 17 तारखेला सांगली आणि सोलापूरमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे या जिल्ह्यांना येलो सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्या – मुंबईची कशी असेल स्थिती ?

सोमवारी पुण्यात हलका पाऊस झाल्याने पुणेकरांना वाढत्या उन्हापासून दिलासा मिळाला. मात्र, सोमवारी पुण्यात हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. पुण्यात पुढील चार – पाच दिवस आकाश बहुतांशी निरभ्र राहण्याचा अंदाज असून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहील. मुंबई आणि उपनगरात तापमानात वाढ होणार आहे. मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तर कोकणातील काही भागात तापमान 38-39 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, तर सांताक्रूझ, ठाणे येथे 42 अंश सेल्सिअस, नवी मुंबईत 41 अंश सेल्सिअस, 43 अंश सेल्सिअस, कल्याणमध्ये 44 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *