राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने (MSRDC) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोड प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार या प्रकल्पासाठी अमेरिका सिंगापूर, आणि इतर परदेशी कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. त्यातच निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ दिली असातना ही मुदतवाढ 16 एप्रिल रोजी संपुष्टात येणार असताना परदेशी कंपन्यांचा सहभाग पाहता पुढील 10 दिवसांनी मुदत वाढवून 28 एप्रिलपर्यंत निविदा प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णय MSRDC कडून घेण्यात आला आहे.
पुणे, पिंपरी – चिंचवड शहरातील वाहतूककोंडी सोडविण्याच्या दृष्टीने MSRDC तर्फे रिंग रोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
दोन टप्प्यांत भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार पश्चिम टप्प्यासाठी 90 टक्के भूसंपादन करण्यात आले आहे, तर पूर्वेच्या मार्गावरील भसंपादन प्रक्रिया सुरू होताच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने भूसंपादन प्रक्रियेला विराम देण्यात आला आहे.
रिंगरोडचे बांधकाम नऊ टप्प्यांत..
पूर्व आणि पश्चिम रिंग रोडची एकूण लांबी 136 किमी असून, रुंदी अंदाजे 110 मीटर आहे. पूर्व रिंगरोड 71.35 किमी आणि पश्चिम रिंग रोड 65.45 किलोमीटरचा आहे.
पश्चिम रिंग रोड हा 5 टप्प्यांमध्ये विभागला जाणार आहे, ज्यामध्ये अनुक्रमे 14 किमी, 20 किमी, 14 किमी, 7.50 किमी आणि 9.50 किमी लांबीचा समावेश असणार आहे. दरम्यान, पूर्वेकडील रिंग रोड 11.85 किमी, 13.80 किमी, 21.20 किमी आणि 24.50 किमी लांबीसह चार टप्प्यांत विभागला जाणार आहे.
रिंगरोडचे असे एकूण नऊ टप्प्यांत काम करण्यात येणार आहे. त्यानुसार एका टप्प्यासाठी तीन कंपन्यांना काम देण्यात येणार आहे. एमएसआरडीसीने प्रथम ठेकेदार कंपन्यांची पात्रता तपासण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविली होती. आता प्रत्यक्ष काम देण्यासाठी ठेकेदार कंपनी नेमण्यासाठीची निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
त्यातच परदेशी कंपन्यांनी निविदा भरल्या असल्याने या कंपन्यांची आर्थिक व्यवहार्यता आणि इतर बाबी तपासण्यासाठी पासणीसाठी कालावधी लागणार असल्याने प्रत्यक्ष कामाला जुलै महिना उजाडणार असल्याचे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
निविदा भरण्याची मुदत 17 जानेवारी ते 1 मार्चपर्यंत देण्यात आली होती. परंतु मुदतीत प्रतिसाद कमी मिळाल्याने निविदा भरण्यास 26 मार्चपर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर आणखी काही कंपन्यांनी निविदा भरल्या तर काही कंपन्यांनी पुन्हा मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केल्याने 16 एप्रिलपर्यंत मुदत वाढविण्यात आली होती ही मुदत मंगळवारी संपुष्टात येणार होती.