राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडत असून, पुढील चार दिवसांत कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या भागांत काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, सोमवारी कोकणात मुसळधार पाऊस पडला असून, राज्याच्या उर्वरित भागातही पाऊस सक्रिय आहे.
राज्याच्या अनेक भागांत पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. रविवारी आणि सोमवारी बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावली.
कोकण भागात मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातील अनेक भागांत हलका, मध्यम ते जोरदार सरी पडल्या. तर बहुतांश ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला सोमवारी सायंकाळपर्यंत कोकण भागातील मुंबईत 51 मिमी, सांताक्रुझ 37, अलिबाग 14, रत्नागिरी 0.2, तर डहाणूमध्ये 0.4 मिमी पाऊस बरसला आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुण्यात 1.7, लोहगाव 3, कोल्हापूर 3, महाबळेश्वर 61, सांगली 0.7 तर सातारामध्ये 0.8 मि.मी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील धाराशीवमध्ये 0.5 मि.मी. तर बीडमध्ये 1 मि. मी. पाऊस पडला.
18 ते 21 जुलैदरम्यान कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो व ऑरेंज अलर्ट जारी केला. मध्य महाराष्ट्रातही ऑरेंज अलर्ट कायम आहे.
मराठवाड्यात यलो अलर्ट दिलेला आहे. विदर्भात यलो व ऑरेंज अलर्ट असून बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.