राज्यात ‘मिरची’चा दर भडकला, ‘या’ बाजार समितीत प्रतिक्विंटल मिळाला तब्बल 1 लाखांचा दर, डिसेंबरपर्यंत भाव राहणार तेजीत..
स्वयंपाकासाठी हमखास वापरली जाणारी लाल मिरची आता पुन्हा एकदा महाग झाली आहे. परिणामतः सामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडण्याची चिन्हे दिसत आहेत. मिरचीला आत्तापर्यंतच्या इतिहासात प्रथमच इतका उच्चांकी भाव मिळाला आहे ब्याडगी मिरचीला क्विंटलला 47 हजार 500 ते 51 हजार रुपये इतका भाव मिळाला आहे. तर किरकोळ बाजारात ही मिरची तब्बल 550 ते 600 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.
राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज बाजार समितीत लाल मिरचीने आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले असून शंखेश्वरी जातीची मिरची तब्बल 1 लाख रुपये क्विंटल दराने विकली गेली आहे.
महाराष्ट्रात जालन्यावरून येणाऱ्या हिरव्या मिरचीलाच जास्त भाव मिळत असल्याने त्यातून चांगला नफा शेतकरी कमावत आहे. अश्या परिस्थितीत शेतकरी लाल मिरची तयार करण्यास उत्सुक नाहीत. दिवाळीमध्ये कर्नाटकातून ब्याडगी, गंटूरचा नवीन माल बाजारात दाखल होणे अपेक्षित होते.
मात्र, यंदा अत्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस आणि वादळ झाल्यामुळे हा हंगाम एक ते दीड महिना लांबला आहे. तसेच, आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील मिरचीची आवक जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणे अपेक्षित आहे.
मिरचीच्या जुन्या साठ्यातील चांगल्या प्रतीचे माल जवळ जवळ संपले आहेत. तर दुय्यम दर्जाचा मालही अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहे. या सर्व कारणांमुळे मिरचीच्या भावात वाढ झाली असून डिसेंबरपर्यंत मिरचीचे भाव तेजीतच राहण्याची शक्यता आहे. एकंदरीत मिरचीचे पीक व साठ्याची स्थिती पहाता यंदा काही प्रमाणात भाव कमी होतील. मात्र, गेल्या वर्षीपेक्षा दर वरचढच राहतील, असा अंदाज सर्वत्र लावला जात आहे.
भारतामध्ये सर्वात जास्त लाल मिरचीचे उत्पादन आंध्र प्रदेशात घेतले जाते. त्यानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील खान्देशात लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते. तेलंगणात तिखट तर कर्नाटकात कमी तिखट मिरचीचे उत्पादन घेण्यात येते.
याशिवाय आसाम आणि पश्चिम बंगाल, पंजाब राज्यांमध्येही लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते. कर्नाटकातून येणाऱ्या ब्याडगी मिरचीला मार्केटयार्डात कॉलीटीनुसार तब्बल 47 हजार ते 51 हजार रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळत आहे. तर आंध्रप्रदेशातील गुंटूर मिरचीला 31 ते 32 हजार रुपये इतका भाव आहे.