Cotton Rate: 10 हजारांवर पोहचलेलं पांढरं सोनं 7 हजारांवर..! शेतकरीराजा हवालदिल, पहा बाजारसमितीतले आजचे प्रतिक्विंटल भाव..
ऑक्टोबर महिन्यात नऊ हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल भाव गाठलेल्या कापसाच्या भावात सध्या मागील काही दिवसापासून सतत घसरण होत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदील झाले आहेत. शेतकऱ्यांनी आणखी भाव वाढेल म्हणून कापूस घरातच साठवून ठेवला आहे. परंतु, आता डिसेंबर महिनाही गेला असला तरी बाजारपेठेत खासगी व्यापाऱ्याकडून 7 हजार 700 रूपये प्रतिक्विंटल ते 8300 रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे कापसाची खरेदी होत आहे.
अगोदरच यंदा राज्यात कमी अधिक पावसामुळे कापसाचे पीक हातचे गेले आहे. त्यात आता आणखी दिवसेंदिवस कमी होत असलेले कापसाचे भाव हे नक्कीच शेतकऱ्यांची चिंता वाढविणारे आहे.
दरम्यान महाराष्ट्रासह जालना जिल्ह्यात कापसाच्या भावात आठ दिवसांत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. शेतकरी दरवर्षी नगदी पीक म्हणून कापसाचे उत्पादन असतो. परंतु, ऐन कपाशीला कैऱ्या लागण्याच्या काळातच कमी अधिक पाऊस झाल्याने कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.
आणि आता कापूस वेचायलाही मजूर सापडत नसल्याने शेतकऱ्यांनी अतिरिक्त भाडे देत बाहेरील मजूर आयात करीत 10 ते 12 रुपये किलो प्रमाणे मजुरी देत कापूस घरात आणला आहे. अनेक ठिकाणी तर एका वेचणीत कपाशीची उलगंवाडी झाली आहे.
ज्या ठिकाणी 10 ते 15 क्विंटल कापूस व्हायचा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना 5 ते 6 क्विंटलवरच समाधान मानावे लागले आहे. दिवाळीच्या अगोदर खासगी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदीला सुरूवात करण्यात आली होती. सुरूवातीला 8 हजार रुपये प्रतिक्टिल खरेदी होणाऱ्या कापसाचे भाव 9 ते 10 हजाराच्या जवळपास रुपयापर्यंत जाऊन पोहचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाचे भाव आणखीन वाढतील म्हणून कापुस घरातच साठवून ठेवला आहे.
परंतू, सध्या दिवसेंदिवस कापसाच्या भावात घसरण होत चालली असल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सुर उमटत आहे. शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेले हे पांढरे सोने घरी आणण्याकरिता शेतकऱ्यांना लागवडीपासून ते कापूस घरी आणेपर्यंत मोठा खटाटोप करावा लागला आहे.
मजुरांची विणवणी करुन कापुस वेचावा लागला आहे. यातच यावर्षी कापसाच्या उत्पादनात देखील घट झाली आहे. कमी भाव व उत्पन्नात घट यामुळे शेतकरी पुरता डबघाईला आला आहे.
कापूस लागवडीपासून ते कापूस बाजारात नेऊन विकण्यापर्यंत खूप मोठा खर्च पिकावर होतो. यामध्ये शेत नांगरणी, वखरणी, कपाशी बियाणे, लागवड, खुरपण, कीटकनाशक फवारणी, खते, कापूस वेचणी, कापूस बाजारात नेऊन विकण्यापर्यंत खूप मोठा खर्च होतो व आज रोजी बाजारात कापूस भाव खूपच कमी आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे कापसाला किमान 10 हजाराच्या वर भाव मिळालाच पाहिजे तेव्हा शेतातून थोडेफार पैसे उरतील.
दत्ता तोलाजी चाळके – शेतकरी
बाजारात कापसाची आवक खूपच कमी आहे. शेतकऱ्यांना अधिकच्या भावाची अपेक्षा आहे. परंतु, बाहेर देशातून कापूस गठान आयात केल्यामुळे कापसाचे भाव वाढायला तयार नाही व आहे ह्या भावात शेतकऱ्याची कापूस विकण्याची मानसिकता नाही त्यामुळे बाजारात कापूस आवक अतिशय कमी झाली असून बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे. आवक कमी झाल्याने व्यापारी ही त्रस्त झाला आहे.
श्रीराम जन्हाड – व्यापारी
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
21/01/2023 | ||||||
राळेगाव | — | क्विंटल | 5000 | 8000 | 8300 | 8250 |
राजूरा | — | क्विंटल | 250 | 8190 | 8280 | 8250 |
अंबड | — | क्विंटल | 400 | 7500 | 8325 | 7800 |
हिंगणा | एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल | क्विंटल | 18 | 8100 | 8400 | 8400 |
आर्वी | एच-४ – मध्यम स्टेपल | क्विंटल | 1007 | 8100 | 8450 | 8300 |
पारशिवनी | एच-४ – मध्यम स्टेपल | क्विंटल | 870 | 8250 | 8275 | 8265 |
अकोला | लोकल | क्विंटल | 56 | 8330 | 8380 | 8355 |
अकोला (बोरगावमंजू) | लोकल | क्विंटल | 147 | 8400 | 8648 | 8524 |
वरोरा | लोकल | क्विंटल | 1392 | 8000 | 8300 | 8100 |
वरोरा-माढेली | लोकल | क्विंटल | 900 | 7700 | 8350 | 8000 |
वरोरा-खांबाडा | लोकल | क्विंटल | 469 | 8250 | 8350 | 8275 |
कोर्पना | लोकल | क्विंटल | 2637 | 7790 | 8100 | 8050 |
सिंदी(सेलू) | लांब स्टेपल | क्विंटल | 1200 | 8380 | 8480 | 8400 |
हिंगणघाट | मध्यम स्टेपल | क्विंटल | 5500 | 8150 | 8455 | 8280 |