पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील विविध पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील 859 पैकी 801 रिक्त जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आता या रिक्त जागा जिल्हा परिषदेच्या पातळीवर भरल्या जाणार आहेत. यामध्ये आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आरोग्य पर्यवेक्षक आदी संवर्गातील पदांचा समावेश आहे.
आरोग्य विभागात विविध पदांचे वेगवेगळे 12 संवर्ग आहेत. यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, आरोग्यसेवक (तीन संवर्ग), आरोग्यसेविका, छायाचित्रकार, अवैद्यकीय पर्यवेक्षक, आरोग्य सहायक (पुरुष), आरोग्य सहायक (महिला) आदींचा समावेश असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.
यापैकी पाच संवर्गातील पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला असून, ही पदे भरण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला देण्यात आला आहे. या पदांच्या भरतीसाठी आणि जिल्हास्तर जिल्हा निवड समितीची स्थापना केली जाणार आहे. या समितीच्या माध्यमातून आरक्षणनिहाय पदे भरली जाणार आहेत.
याबाबतची जाहिरात येत्या महिनाभरात प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, याआधी सन 2019 मध्ये सुरू केलेली भरती प्रक्रिया ही रद्द केली आहे.
या पदांची होणार भरती
पदे जागा
आरोग्यसेवक – 262
आरोग्यसविका – 503
औषध निर्माता – 29
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 04
आरोग्य पर्यवेक्षक – 03
एकूण संख्या – 801