MHADA । ठाणे, घणसोली, वसई – विरारमध्ये फक्त 14 लाखांत घराचं स्वप्न होणार पूर्ण..! तब्बल 4752 घरांच्या सोडतीसाठी अर्जाला सुरवात..
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या माध्यमातून मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या 4 हजार 752 घरांच्या सोडतीला अखेरीस मुहूर्त मिळाला असून, 20 फेब्रुवारीपासून नव्या नोंदणी प्रणाली अंतर्गत सोडतीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या माध्यमातून 11 एप्रिल रोजी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडतीचा कार्यक्रम पार पडणार आहे. यासाठी इच्छुकांना 20 फेब्रुवारीपासून घरांसाठी अर्ज घेता येणार असून NEFT, आरटीजीएसनं अनामत रक्कमेसह घरासाठीचा अर्ज 20 मार्चपर्यंत सबमिट करता येणार आहे.
कोकण मंडळांतर्गत पंतप्रधान आवास योजना, खाजगी विकासकांची घरे आणि म्हाडाची घरे अशी एकत्रित 4752 घरांची सोडत काढण्यात येणार आहे. खाजगी विकासकांकडून म्हाडाला मिळालेल्या 1554 घरांचा समावेश असून, वसई, विरार, ठाणे, पाचपाखाडी, डायघर, सानपाडा, घणसोली येथील अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटाचा समावेश आहे. घरांची किंमत 14 लाख ते 30 लाख रुपये ठरवण्यात आली आहे.
कोकण मंडळाच्या माध्यमातून पहिल्यांदाच अद्ययावत सॉफ्टवेअर प्रणालीतर्गत घरांच्या नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदारांची पात्रता निश्चिती ऑनलाइनच करण्यात येणार असल्याने पात्र उमेदवारांनाच सोडतीत सहभागी होता येणार आहे.
घराचा ताबा एका वर्षाच्या आत देण्यासाठी नवी सॉफ्टवेअर प्रणाली कार्यरत राहणार आहे. यंदा सोडतीचा अर्ज सादर करतानाच म्हाडा घरांसाठी केवळ 7 कागदपत्रे ऑनलाइन सादर करावी लागणार आहेत. मागील 6 महिन्यांपासून कोकण मंडळाच्या सोडतीसाठी अधिकारी प्रयत्नशील होते. अखेरीस सोडतीला मुहूर्त मिळाला असून ठाणे, विरारमध्ये परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होणार आहेत.
पहा ठिकाण, घरांची संख्या आणि उत्पन्न गटानुसार किंमती..