महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून भविष्यातील सोडतीच्या दृष्टीने घरांचा साठा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत या दृष्टीनेच नुकत्याच पार पडलेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत सायन प्रतिक्षा नगर येथे पुनर्विकासांतर्गत 612 घरे बांधण्याबाबत मंजुरी देण्यात आली.
मोठ्या प्रमाणात म्हाडा वसाहत असलेल्या ठिकाणांमध्ये विक्रोळी, मुलुंड यासह सायन प्रतीक्षानगर या वसाहतींचा समावेश आहे. त्यामुळे सायन प्रतीक्षानगर येथील संक्रमण शिबिराच्या जागेवर पुनर्विकासांतर्गत घरे बांधण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. यामध्ये अत्यल्प गटासाठी 84, तर मध्यम उत्पन्न गटासाठी 528 घरे बांधण्यात येणार आहेत. यासाठी 307 कोटी 86 लाख 70 हजार खर्च अपेक्षित आहे.
यापूर्वी प्रतीक्षानगर वसाहतींतील टप्पा 5 मधील संक्रमण शिबिराचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या पुनर्विकासांतर्गत अत्यल्प गटासाठी 91, अल्प गटासाठी 31, मध्यम गटासाठी 56, संक्रमण शिबिरासाठी 285 गाळे आणि 15 दुकाने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र आता या आराखड्यात बदल करण्यात आला आहे. भविष्यात सोडतीच्या दृष्टीने घरांचा साठा वाढवण्यासाठी म्हाडाने वसाहतींच्या पुनर्विकासाला हिरवा कंदील दाखवला आहे. नव्या घरांची निर्मिती आणि जुन्या वसाहतीतील रहिवाशांना सुसज्ज घरे अशी दोन्ही संधी साधण्यात येणार आहेत.