पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी – चिंचवड महापालिका या मार्गाचे विस्तारीकरण पुढे निगडीपर्यंत होणार आहे. या विस्तारीत मार्गाचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) केंद्र शासनाने मंजूर केल्यानंतर येत्या तीन महिन्यांत या मार्गाची निविदाप्रक्रिया पूर्ण करून काम सुरू केले जाईल, अशी माहिती महामेट्रो व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

पिंपरी ते स्वारगेट या मेट्रो मार्गावर पहिल्या टप्प्यात पिंपरी ते फुगेवाडी या दरम्यान पासून मेट्रोसेवा सुरू झाली. तर, सद्यस्थितीत पिंपरी ते सिव्हिल कोर्टदरम्यान मेट्रो धावत आहे. मात्र, य मेट्रोमार्गाचे विस्तारीकरण पुढे पिंपरीपासून निगडीपर्यंत व्हावे, अशी मागणी पिंपरी – चिंचवडकरांची होती. मात्र, मागील दोन वर्षांपेक्षा अधिक काळ हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी प्रलंबित होता.

अखेर 23 ऑक्टोबर 2023 रोजी केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी आवास मंत्रालयाने अंतिम मान्यता दिली. त्यामुळे निगडीपर्यंत मेट्रो विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या संदर्भात श्रावण हर्डीकर म्हणाले की, हा मार्ग 4.13 किलोमीटर लांबीचा असणार आहे. त्यामुळे निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचे शहरवासीयांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पिंपरी – चिंचवडमधील रहिवाशांना चांगली कनेक्टिव्हिटी देण्यासाठी हे विस्तारीकरण आवश्यक होते. हा मेट्रो प्रकल्प शहराच्या दळवळणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पिंपरी ते निगडी दरम्यान तीन मेट्रो स्टेशन असून शेवटचे स्टेशन भक्ती-शक्ती चौकात असणार आहे. मेट्रो मार्गासाठी जागेच्या भूसंपादनाची आवश्यकता भासणार नाही.

 

परंतु, स्टेशनसाठी रस्त्याच्या बाजूला काही जागेचे भूपसंपादन करावे लागेल. महामेट्रोकडून निविदाप्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू झाली आहे येत्या तीन महिन्यात निविदाप्रक्रिया पूर्ण करून या मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होईल. विस्तारीत मेट्रो मार्गाचे काम जलद गतीने करण्याचा प्रयत्न राहील तीन वर्षात या मार्गावर मेट्रोतून प्रवासी वाहतूक करण्याचे नियोजन आहे, असे हर्डीकर म्हणाले.

प्रवासी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न.. 

पिंपरी ते स्वारगेट या मार्गावर पिंपरी ते सिव्हील कोर्ट मेट्रो सेवा सुरू आहे. यामध्ये पिंपरी स्टेशनवरून अधिक प्रवासी संख्या आहे. परंतु, इतर स्टेशनवरून प्रवासी संख्या अत्यल्प आहे. सर्वच मेट्रो स्टेशनवरून प्रवासी संख्या कशी वाढेल? जास्तीत जास्त शहरवासीयांना मेट्रो प्रवासाकडे आकर्षित करणे आणि त्यासाठी का करावे लागेल, याचा अभ्यास केला जात आहे. त्यानुसार सुधारणा करण्यात येत आहेत. महामेट्रो प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतेही दुर्लक्ष करणार नसून सर्व खबरदारी घेत असल्याचेही हर्डीकर यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *