Take a fresh look at your lifestyle.

MPSC चा गड सर करत महिलांनी फडकवला यशस्वीतेचा झेंडा; APP मधून २२६ महिला बनल्या सरकारी वकील..

0

आम्ही कुठल्याही क्षेत्रात कमी नाही, हे महिलांनी आधीच सिद्ध करून दाखवले आहे. केवळ शिक्षणामुळे महिलांनी विविध क्षेत्रे काबीज केली आहेत. नुकत्याच लागलेल्या ‘MPSC ‘च्या निकालात उत्तीर्ण होऊन तब्बल २२६ महिलांना सहायक सरकारी अभियोक्ता होण्याचा मान मिळाला आहे.

अंगावर काळाकोट चढवून राज्यभरातील विविध न्यायालयांमध्ये या महिला सरकारी पक्षाची बाजू जोरकसपणे मांडून आपले कसब दाखवून देणार आहेत. ५३१ उमेदवारांमधून २२६ महिला ‘एपीपी’ अर्थात असिस्टंट पब्लिक प्रॉसेक्यूटर बनल्या आहेत.

पूर्वी न्यायालयांमध्ये वकिली व्यवसाय करण्यास महिला धजावत नसल्याचे दिसून येत होते. याशिवाय सरकारी वकील अथवा न्यायाधीशांच्या नोकरीकडेही महिलांचा फारसा कल नव्हता. मात्र, शिक्षणाने महिला उच्चशिक्षित होऊन मोठमोठ्या पदापर्यंत पोहोचल्या आहेत. विविध क्षेत्रात महिलांचा बोलबाला आहे.

आता मनातील भीतीला पळवून लावत महिलांनी न्यायालयांमध्ये आपली कर्तबगारी सिद्ध केली आहे. विविध न्यायालयांमध्ये न्यायाधीश म्हणून महिलावर्ग न्यायदान करू लागला आहे. तर अनेक महिला खासगी वकिली व्यवसाय करत आहेत अनेक महिला सरकारी अभियोक्ता आणि सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून राज्यभरातील न्यायालयांमध्ये कर्तव्य बजावत आहेत.

त्यांनी आपल्यातील गुणवत्ता सिद्ध केली आहे. दरम्यान, शासनाच्या गृह विभागाच्या आस्थापनेवरील सहायक सरकारी अभियोक्ता गट – अ संवर्गातील पदभरतीसाठी गतवर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात निघाली. असंख्य उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. मात्र कुणी यशस्वी, कुणी अपयशी ठरले. (MPSC -Assistant Public Prosecutor Group – A Cadre)

या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. ५४७ पैकी उत्तीर्ण ५३१ उमेदवारांची यादी जाहीर झाली. उर्वरित १६ उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली आहे . उत्तीर्ण उमेदवारांमध्ये तब्बल २२६ महिलांनी सहायक सरकारी अभियोक्तापदावर आपले नाव कोरले. यातील बहुतांश उमदवार घरसंसार सांभाळून खासगी वकिली व्यवसाय करत होत्या, हे विशेष !

पहा नेमकी कोणती असती ही भरती :- PDF जाहिरात 

वर्गवारी :-

ओपनमधून १७, एससी ४७, ओबीसी ६३, ईडब्ल्यूएस ३२, एनटी सी १४, एनटी बी ९, एनटी डी ६, एसबीसी १०, डीटी ए ७ व एसटीच्या १० महिला उमेदवार उत्तीर्ण झाल्या.

अशा होत्या जागा :-

५४७ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. अनुसूचित जाती ६०, अनुसूचित जमाती २५, वि.जा. (अ) १८, भ.ज. ब) १७, भ.ज. (क) २७, विमाप्र १६, आ.दु.प. ५५, इमाव १०५, एकूण आरक्षित ३३५ व अराखीव (खुला) २१२ जागा प्रवर्गांनुसार होत्या. एकूण जागांमध्ये सर्वसाधारणकरिता ३५३, महिलांसाठी १६६ , खेळाडू २८ व दिव्यांगांसाठी २२ जागांचा समावेश होता.

आव्हाने स्वीकारली.. 

प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयात फौजदारी न्यायालयांमध्ये प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात एमपीएससीमधून निवडलेल्या महिला उमेदवार काळाकोट चढवून विविध प्रकरणांमध्ये सरकारची बाजू भक्कमपणे मांडताना दिसतील. आव्हाने स्वीकारण्याची तयारी दर्शवून महिलांनी आत्मविश्वास, जिद्द, चिकाटीने व कठोर मेहनत घेत अभ्यास केला. एमपीएससीचा गड सर करत महिलांनी यशस्वीतेचा झेंडा मोठ्या अभिमानाने फडकवला.

Leave A Reply

Your email address will not be published.