बुलेट ट्रेन प्रकल्प म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई – अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरचे (MAHSR) काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, काम वेगाने सुरू असून गुजरातमध्ये एका महिन्यात तीन नदीवरील पूल बांधण्याची माहिती दिली. हायस्पीड कॉरिडॉर बनवणाऱ्या नॅशनल हाय स्पीड रेल कॉरिडॉर (NHSRCL) च्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, 24 पुलांपैकी 4 पुलांचे बांधकाम गेल्या सहा महिन्यांत झाले आहे. 

NHSRCL ने एका प्रकाशनात म्हटले आहे की, या चार पुलांपैकी तीन पुल एका महिन्यात नवसारी जिल्ह्यात बांधले गेले आहेत, जे हायस्पीड मार्गावरील बिलीमोरा आणि सुरत स्टेशन दरम्यान येतात.

या कॉरिडॉरवर 24 नदी पूल आहेत, त्यापैकी 20 गुजरातमध्ये आहेत आणि उर्वरित 4 पूल महाराष्ट्रात आहेत. NHSRCL ही भारतीय रेल्वेची पूर्ण मालकी असलेलया उपकंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पहिला पूल पूर्णा नदीवर, दुसरा मिंधोला नदीवर आणि तिसरा पूल अंबिका नदीवर बांधण्यात आला आहे.

एका महिन्यातच बांधले तीन पूल..

MAHSR कॉरिडॉरने बरीच प्रगती केली आहे, कारण गेल्या एका महिन्यात तीन नदी पूल पूर्ण झाले आहेत. गुजरातमधील सर्वात लांब नदीवरील पूल 1.2 किमीचा असून तो नर्मदा नदीवर बांधला जात आहे. त्याच वेळी, या कॉरिडॉरचा सर्वात लांब नदीवरील पूल 2.28 किमीचा आहे, जो वैतरणा नदीवर बांधला जात आहे.

NHSRCL चे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र प्रसाद म्हणतात की नद्यांवर पूल बांधण्यासाठी कार्यक्षम नियोजन आवश्यक आहे. ते म्हणाले की, मिंधोळा आणि पूर्णा नदीवर पूल बांधताना अरबी समुद्राच्या लाटांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते. त्यांनी सांगितले की, अंबिका नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी आमच्या अभियंत्यांनी 26 मीटर उंचीवरून काम केले.

360 मीटर लांबीचा पूल..

NHSRCL अधिकाऱ्याने सांगितलं की, पूर्णा नदीवरील पूल 360 मीटर लांब आहे आणि त्याच्या बांधकामादरम्यान, अरबी समुद्रातील उंच आणि कमी भरतींचे सतत निरीक्षण करणे आवश्यक होते. NHSRCL च्या म्हणण्यानुसार, पुलाचा पाया घालण्याचे कामही खूप आव्हानात्मक होते कारण भरतीच्या वेळी नदीतील पाण्याची पातळी पाच ते सहा मीटरने वाढायची..

बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू..

मिंधोला नदीवरील 240 मीटर लांबीच्या पुलाच्या बांधकामासाठी अरबी समुद्रातील उंच आणि कमी भरतीचे सतत निरीक्षण केले जात होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्याचवेळी अंबिका नदीवरील 200 मीटर लांबीच्या पुलासाठी नदीकाठच्या तीव्र उतारामुळे आव्हान निर्माण झाले होते.

गुजरातमधील वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती या आठ हायस्पीड रेल्वे स्थानकांवर वेगवेगळ्या टप्प्यात बांधकाम सुरू आहे. NHSRCL ने सांगितलं की, बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *