Mumbai-Goa Highway : आता मुंबई ते गोवा फक्त 7 तासांत, ‘या’ दिवशी होणार महामार्ग खुला, NHAI ने दिली हायकोर्टात माहिती..
सुमारे बारा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून फेब्रुवारी 2024 मध्ये पूर्णत्वाला जाईल, अशी माहिती राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) उच्च न्यायालयात दिली. तसेच या रस्त्याच्या कामाचा प्रगत अहवाल उच्च न्यायालयात सादर केला. त्यावर खंडपीठाने समाधान व्यक्त केले.
मुंबई – गोवा महामार्गावर (एनएच 66) मोठ्या प्रमाणावर पडलेल्या खड्डड्यांच्या पार्श्वभूमीवर मूळचे कोकणातील असलेले अँड. ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
त्या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) कामाला होणाऱ्या विलंबासह आतापर्यंत केलेल्या कामाचा प्रगत अहवाल न्यायालयात सादर केला. सध्या या महामार्गावरील अरवली – कांटे – वाकड या पट्ट्यातील 9.50 किलोमीटर महामार्गाचे बांधकाम बाकी असून ते फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती हायकोर्टाला मुख्य सरकारी वकील पी. ए. काकडे यांनी हायकोर्टाच्या दिली आहे.
या अहवालावर याचिकाकर्ते अँड. ओवेस पेचकर यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी या महामार्गावर होत असलेल्या अपघातांवर बोट ठेवले. काम सुरू असल्याने चुकीच्या दिशेने वाहतूक होते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे, याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. खंडपीठाने प्रत्येक अपघातासाठी राज्याला जबाबदार धरता येणार नाही, असे स्पष्ट करत कामाच्या प्रगत अहवालावर समाधान व्यक्त करून याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.
दरवर्षी विशेषत: गणेशोत्सवाच्या काळात चर्चेत असणारा मुंबई – गोवा महामार्गाच्या बांधकामाने सध्या वेग पकडला आहे. या बहुउद्देशीय महामार्गावरील पळस्पे फाटा ते इंदापूर या 84 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे 90 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. पावसाळा आणि गणेशोत्सवात या महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट होते, हे विशेष. मोठमोठे खड्डे आणि वाहतुकीची कोंडी पाहता या महामार्गाचे नव्याने रुंदीकरण करून सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडूनही मिळालेल्या माहितीनुसार हा महामार्ग फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे मुंबईहून कोकणात जाणाऱ्या वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.
12 वर्षांपूर्वीचं रस्ता झाला होता मंजूर..
मुंबईहून कोकण आणि गोव्याकडे होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई-गोवा महामार्गाला 12 वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली होती. या महामार्गाच्या दुर्दशेबाबत अनेक आंदोलनेही झाली. पनवेलजवळील पळस्पे ते इंदापूर हा चौपदरी रस्ता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बांधण्यात येत आहे. 80% भूसंपादन झाल्यानंतर 2017 मध्ये या महामार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू झाले.
हे काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या उद्देशाने कंत्राटदारांना 10 तालुकानिहाय पॅकेजमध्ये विभागून काम सुरू करण्यात आले. सर्व पॅकेजवर काम सुरू आहे. इंदापूर ते झाराप या 355 किमीपैकी 243 किमीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
वनविभागाचीही मिळाली मान्यता..
विशेष म्हणजे या महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाचा प्रश्न निर्माण झाला होता. प्रलंबित भूसंपादन भरपाईची रक्कम रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंजूर केली आहे. भूमी राशी पोर्टलद्वारे वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. या महामार्गासाठी प्राथमिक स्तरावर वनविभागाची मंजुरी मिळाली असून, उर्वरित कामासाठी परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. या महामार्गाचे पूर्ण रुंदीकरण झाल्यानंतर मुंबई ते गोवा हे अंतर अवघ्या 7 तासांत कापता येणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा..
मुंबई-गोवा महामार्गाचा विकास नागपूरसाठी नुकत्याच करण्यात आलेल्या समृद्धी कॉरिडॉरसह महानगर आणि पुणे दरम्यानच्या द्रुतगती मार्गाच्या धर्तीवर करण्यात येईल, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले.
काही दिवसांपूर्वी ‘मालवणी महोत्सवा’च्या समारोप समारंभाला संबोधित करताना ते म्हणाले की, मुंबई आणि गोवा दरम्यानचा द्रुतगती मार्ग हा ग्रीनफिल्ड (नवीन बांधकाम) असेल आणि त्यावर नियंत्रित प्रवेश असेल. राज्यातील कोकण विभागातील सिंधुदुर्गकडे जाणार्या कोस्टल रोडचेही रुंदीकरण करण्यात येणार आहे.