दक्षिण मुंबई ते ठाण्याकडे रस्त्याने जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता वाहनधारकांना दक्षिण मुंबईहून ठाण्यात कोणताही अडथळा न येता जाता येणार आहे. मानखुर्द ते इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून ठाणे दिशेकडे जाणारा छेडानगर जंक्शनवरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
1235 मीटर लांब आणि 8.5 मीटर रुंद 2 लेन उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर ठाणे ते मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना सिग्नल फ्री पॅसेज उपलब्ध होणार आहे. छेडानगर जंक्शन येथे बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलासोबतच सांताक्रूझ – चेंबूर लिंक रोड विस्तारांतर्गत कापडिया नगर ते वाकोला जंक्शनपर्यंत बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचेही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे.
25 मिनिटांची होणार बचत..
मानखुर्दकडून ठाण्याच्या दिशेने जाणारा उड्डाणपूल सुरू झाल्याने वाहनधारकांचा सुमारे 20 ते 25 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. ईस्टर्न फ्रीवे, चेंबूर, मानखूर्द, नवी मुंबई या दिशेने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. मुंबईसोबतच नवी मुंबईतून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांनाही आता सिग्नलमुक्त मार्ग मिळणार आहे.
छेडानगर जंक्शन हे ईस्टर्न एक्स्प्रेसचे सर्वात वर्दळीचे जंक्शन आहे. दक्षिण मुंबईतील वाहने शहराच्या वाहतुकीत अडकून न पडता छेडानगर जंक्शनपर्यंत जलद पोहोचण्यासाठी 2014 मध्ये 16.8 किमी लांबीचा फ्रीवे बांधण्यात आला. मात्र फ्रीवेवरून दक्षिण मुंबईतील वाहने काही मिनिटांत न थांबता मानखुर्दजवळ पोहोचतात.
छेडानगर जंक्शनवर अवजड वाहतुकीमुळे काही मीटर अंतर कापण्यासाठी वाहनांना तासन्तास लागतात. मानखुर्द आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेला जोडणाऱ्या उड्डाणपुलामुळे नागरिकांच्या वाहतुकीच्या समस्येतून सुटका होण्याची अपेक्षा आहे.
कुर्ला – बीकेसीपर्यंत पोहोचणेही झालं सोपं..
सांताक्रूझ -चेंबूर लिंक रोड विस्ताराच्या पहिल्या टप्प्यातील कुर्ला ते वाकोला रज्जाक जंक्शन हा 3.03 किमी लांबीचा उड्डाणपूलही वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे बीकेसी ते कुर्ल्यापर्यंतच्या वाहतुकीची समस्या कमी होईल, असा अंदाज एमएमआरडीएने व्यक्त केला आहे.
पूर्व आणि पश्चिम महामार्ग जोडण्यासाठी सांताक्रूझ -चेंबूर लिंक रोडचे दोन टप्प्यांत विस्तार करण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील एका महामार्गावरून दुसऱ्या महामार्गावर जाणे अत्यंत सोपे होणार आहे. बीकेसीजवळील वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होणार आहे.
मानखुर्द – ठाणे उड्डाणपूल :-
1235 मीटर लांब, 8.5 मीटर रुंद, 2 लेन झाल्या सुरू..
छेडानगर जंक्शन –
सांताक्रूझ चेंबूर फ्लायओव्हर 368 मीटर लांब, 8.5 मीटर रुंद, 2 लेनचे झाले उद्घाटन..