पुणे जिल्ह्यातील पेरणे येथील विजयस्तंभाच्या 1 जानेवारी रोजी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नगर – पुणे महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला व पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी तशा प्रकारचे आदेश जारी केले आहेत.
हे बदल 31 डिसेंबरपासून लागू करण्यात येणार आहेत. अहमदनगर – पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथून पुण्याकडे जाणारी वाहतूक व्यवस्था अशी बेलवंडी फाटा, देवदैठण, ढवळगाव , पिंपरी कोलंदर, उक्कडगाव, बेलवंडी, दौंडमार्गे लोणी व्यंकनाथ, मढे वडगाव, काष्टी, दौंड, सोलापूर – पुणे महामार्गाने पुण्याकडे…
तर नगर येथून पुण्याकडे जाणारी वाहतूक व्यवस्था कायनेटिक चौक, केडगाव बायपास, अरणगाव बायपास, दौंड मार्गे, सोलापूर – पुणे महामार्गाने पुण्याकडे, अशी राहील, असे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशात म्हटले आहे.
त्याचप्रमाणे पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशात शिक्रापूर ते चाकण ही वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. अहमदनगरकडून पुणे, मुंबईकडे जाणारी जड वाहने – शिरूर, न्हावरा फाटा, न्हावरा पारगाव, चौफुला, यवत, सोलापूर रोडमार्गे पुण्याकडे येतील.
पुण्याहून नगरकडे येणारी जड वाहने पुणे – सोलापूर हायवे रोडने चौफुला केडगावमार्गे न्हावरा, शिरूर, अहमदनगरकडे येतील. मुंबई येथून नगरकडे येणारी जड वाहने (ट्रक, टेम्पो) वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायण गव्हाण, आळेफाटामार्गे नगरला येतील.
त्याचप्रमाणे मुंबई येथून नगरकडे जाणारी हलकी वाहने (कार, जीप) वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूरमार्गे नगरला येतील. पुणे येथील जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केलेला आदेश 31 डिसेंबर सायंकाळी 5 ते 1 जानेवारी 2023 च्या रात्री म्हणजे 12 वाजेपर्यंत लागू राहील. तसेच नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जारी केलेला आदेश 31 डिसेंबर 2022 ते 2 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहील.