मुंबई मध्ये विविध ठिकाणी चालू असलेल्या मेट्रो प्रकल्पातील, ठाणे – भिवंडी – कल्याण या मेट्रो – 5 च्या मार्गातील ठाणे ते भिवंडी दरम्यान 12.7Km चा पहिला टप्पा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यामध्ये आधुनिक सुविधांनी युक्त अशी एकूण 7 स्टेशन्स उभारली जाणार आहेत. या टप्प्यावरील स्टेशन्सची 64% कामे पूर्ण झाली आहेत तर बाकी मार्गाचे काम 70% पूर्ण झाले आहे.
असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे. यात महत्वाची बाब म्हणजे मेट्रो-५ चा पहिला टप्पा ठाणे ते भिवंडी दरम्यान कनेक्टिव्हिटी प्रदान करणार असल्याने यामुळे प्रवासाच्या वेळेत साधारणतः 20 मिनिटांची बचत होणार आहे. याचा सर्व ठाणे व भिवंडीकरांना मोठा फायदा होणार आहे.
24 ऑक्टोबर 2017 रोजी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने मेट्रो लाईन-5 (ठाणे – भिवंडी – कल्याण) साठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार केला होता. यासाठी 8,416 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची पायाभरणी भारताच्या पंतप्रधानांनी 19 डिसेंबर 2018 रोजी केली होती.
मेट्रो मार्ग – 5 मध्ये कशेळी येथे 550 मीटर लांबीची खाडी आहे. या खाडीवर पूल उभारण्याकरिता सेगमेंटल बॉक्स गर्डर या पद्धतीचा वापर केला जाणार आहे. याद्वारे एकूण 13 स्पॅन उभारण्यात येतील. आतापर्यंत 8 स्पॅनची उभारणी पूर्ण झाली असून, या प्रत्येक स्पॅनची लांबी सुमारे 42 मीटर आहे.
मेट्रो-5 च्या पहिल्या टप्प्यात घोडबंदर रोडवरील कापूरबावडी, बाळकुम नाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा व धामणकर नाका (भिवंडी) या 7 स्थानकांचा समावेश आहे. मेट्रो-5 साठी कशेळी येथे सेंट्रलाइज्ड डेपोकरिता जागा निश्चित करण्यात आली असून, भूसंपादन आणि निविदा प्रक्रियेचे काम प्रगतिपथावर आहे.
या प्रकल्पातील अंजूरफाटा येथे रेल्वे ओव्हर ब्रिजकरिता स्पेशल स्टील गर्डर स्पॅन बसवण्यात येणार आहेत. ज्याचे काम लवकरच सुरु केले जाईल असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी सांगितले आहे.
ठाणे – भिवंडी – कल्याणमधील स्टेशनची नावे :-
कापूरबावडी, बाळकुम नाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूर फाटा, धामणकर नाका, भिवंडी, गोपाळ नगर, टेमघर, राजनौली गाव, गोवेगाव एमआयडीसी, कोनगाव, दुर्गाडी किल्ला, सहजानंद चौक, कल्याण रेल्वे स्टेशन, कल्याण रेल्वे स्टेशन, कल्याण..