Nagpur to Goa Shaktipeth Expressway : 760Km अंतर, 86,300 कोटींचा खर्च ; राज्यातील ‘हे’ 12 जिल्हे जोडणार, पहा रोडमॅप..
राज्यात नव्याने तयार करण्यात आलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची राज्यासह संपूर्ण देशात चर्चा आहे. अशातच राज्यात आणखी एका मोठ्या महामार्गाचे बांधकाम करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. हा महामार्ग दुसरा तिसरा कोणता नसून नागपूर ते गोवा एक्स्प्रेस वे असणार आहे. हा नवा महामार्ग बनविण्याची बाब अजूनही शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र हा रास्ता देखील लवकरच होईल असे म्हटलं जात आहे.
नागपूर ते गोवा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे मुळे नागपूर ते गोवादरम्यानचे अंतर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या महामार्गासाठी सुमारे 86 हजार कोटी रुपयांचा खर्च होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते गोवादरम्यानच्या महामार्गाबाबत भाष्य केलं होतं. लवकरच त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. ही बाब सर्वप्रथम त्यांनी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिलच्या विदर्भ चॅप्टरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जाहीर केली होती.
त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या महामार्गामुळे भविष्यात नागपुरातून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र ते थेट गोवा, असा प्रवास आणखी जलद आणि सुखकर होणार आहे, असा दावा त्यांनी केला होता.
हा मार्ग पूर्णत्वास आल्यानंतर याची लांबी 760 किमी असणार आहे. त्यानंतर हा महामार्ग महाराष्ट्रातला सर्वातजास्त लांबीचा महामार्ग ठरणार आहे. तर या महामार्गाच्या भूसंपादनासाठी व महामार्गासाठी 86,300 कोटींचा खर्च होणार आहे.
येत्या 5 वर्षात प्रत्येक जिल्ह्याला जोडण्याची मेगा योजना
पहा रोडमॅप
राज्यातील 12 जिल्हे जोडणार..
या महामार्गामुळे राज्यातील 12 जिल्हे जोडले जाणार आहेत. यामध्ये वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. नंतर पुढे हा महामार्ग महाराष्ट्र – गोवा सीमेवर कोकण एक्सप्रेसला जोडला जाणार आहे. या एक्स्प्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवासाचा वेळ सध्याच्या 21 तासांच्या प्रवासाहून सुमारे 7 तासांपर्यंत कमी होणार आहे.
धार्मिक पर्यटनाला मिळणार चालना
या ग्रीन फिल्ड एक्सप्रेस – वे च्या उभारणीनंतर सेवाग्राम आश्रम, कारंजा लाड, माहूर येथील देवी, औंढ्या नागनाथ मंदिर, नांदेड गुरुद्वारा, परळी वैजनाथ, अंबाजोगाईची योगेश्वरी, लातूरचा सिद्धेश्वर, पंढरपूरचे भगवान विठ्ठल – रुक्मिणी मंदिर, तुळजापूरची भवानी माता, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंदिर, मंगळवेढा , नरसोबाची वाडी, महालक्ष्मी, कुणकेश्वर आणि पत्रादेवी ही धार्मिक पर्यटनस्थळे जोडली जाणार आहेत. त्यातून पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न आहे.
कधी होणार कामाला सुरुवात ?
या मार्गाचे काम नेमके कधी सुरू होणार, याबाबत विविध शंका उपस्थित करण्यात येत होत्या. मात्र, आता शिदे – फडणवीस यांचे सरकार आल्यामुळे त्यांच्या या ‘ड्रीम प्रोजेक्टसाठी प्रशासकीय पातळीवरदेखील पावले उचलण्यात येत आहेत.
नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अनिकेत तटकरे यांनी या मुद्द्यावर तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत यासंदर्भात उपस्थित प्रश्नाला लेखी उत्तर दिले आहे. त्यामुळे लवकरच हा मार्ग सत्यात उतरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.