आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजनासाठी प्रस्तावित असलेल्या 56 किलोमीटर लांबीच्या बाह्यरिंगरोडसाठी 26 लाख 80 हजार चौ. मी. अर्थात सुमारे 268 हेक्टर जागेचे संपादन करावे लागणार आहे. यासंदर्भातील प्राथमिक अहवाल महापालिकेने तयार केला असून, तो लवकरच शासनाकडे पाठविला जाणार आहे.
संबंधित भूसंपादनापोटी जागा मालकांना रोख स्वरूपात मोबदला अदा करणे शक्य नसल्यामुळे गत सिंहस्थाच्या धर्तीवर अडीचपट टीडीआर देण्याचा निर्णय झाल्यास 67 लाख चौ. मी. टीडीआर द्यावा लागणार असून, त्यामुळे टीडीआरचे दर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविक, साधु – महंतांना सेवा – सुविधा पुरविण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. त्याचबरोबर सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित असलेल्या दोन रिंगरोडच्या भूसंपादनाची तयारीही सुरू करण्यात आली आहे.
शासनाच्या नगररचना कार्यालयाने प्रस्तावित रिंगरोडचा नकाशा तयार केल्यानंतर महापालिकेनेही प्राथमिक अहवाल तयार केला आहे. यात 60 मीटर रुंदीच्या रिंगरोडसाठी 158 हेक्टर, तर 36 मीटर रुंदीच्या रिंगरोडसाठी 109 हेक्टर जागा संपादनाची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
यासंदर्भातील प्रस्ताव आता शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. या जागेच्या संपादनासाठी रोखीने मोबदला अदा करण्याची महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे प्रोत्साहनपर टीडीआरच्या माध्यमातून मोबदला अदा करण्याची योजना आखण्यात येत आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर टीडीआर बाजारात आल्यास टीडीआरचा दर कोसळण्याची भीती आहे त्यामुळे शासन आता काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 10 हजार कोटींचा खर्च येण्याची शक्यता आहे.
60 मीटर रिंगरोडचा मार्ग :
मुंबई महामार्गावरून खत प्रकल्पाजवळ डाव्या हाताला वळून पुढे पाथर्डी शिवारातून मनपा हद्दीच्या कडेने वालदेवी नदीला समांतर , पिंपळगाव खांब शिवारामधून वालदेवी नदी ओलांडून विहितगाव शिवारामध्ये, पुढे वालदेवी नदी ओलांडून, नाशिक – पुणे रोड ओलांडून देवळाली शिवारातून रेल्वे लाइन ओलांडून, पंचकजवळ गोदावरी नदी ओलांडून माडसांगवी शिवारातून मनपा हद्दीबाहेर औरंगाबाद रो ओलांडून आडगाव शिवारामध्ये मनपा पूर्व हद्दीलगत, पुढे ट्रक टर्मिनसच्या पूर्व बाजूला येऊन हा 60 मीटरचा रिंगरोड मुंबई – आग्रा महामार्गाला मिळेल.
३६ मीटर रिंगरोडचा मार्ग :
आडगाव ट्रक टर्मिनससमोरून 36 मीटर रिंग रोडची सुरुवात होईल. पुढे आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद, मनपा हद्दीबाहेर जलालपूर शिवारातून गोदावरी नदी ओलांडून बारदान फाटा येथे, गंगापूर रोड क्रॉस करून गंगापूर उजवा तट कालवा क्रॉस करून सातपूर एमआयडीसीला लागून त्र्यंबक रोड पर्यंत हा रस्ता येईल. पुढे नंदिनी नदी ओलांडून अंबड एमआयडीसीतून गरवारे रेस्ट हाउससमोर मुंबई – आग्रा हायवेला हा रस्ता मिळेल.