शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना नेहमीच सुधारित आणि भरघोस उत्पन्न देणाऱ्या बियाणांची गरज असते. बाजारात नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वाण येत आसतात. भरघोस उत्पन्न देण्याबरोबरच बियाण्यांपासून मिळणारे पीक चांगल्या दर्जाचे आणि चवदार असणे देखील तितकेच महत्वाचे आहे. याचदृष्टीने महाराष्ट्रातील विविध संशोधन केंद्र नेहमीच प्रयत्नशील असतात.
अश्याच एका प्रयत्नातून जळगावातील ममुराबाद येथील महात्मा फुले संशोधन केंद्रात उडीद आणि मुगाचे नवे वाण प्रसारित करण्यात आले आहे. नुकतीच या दोन्ही वाणांना कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या वाणांचा शेतकऱ्यांना पेरणीसाठी उपयोग करता येणार आहे. जळगावात प्रसारित झालेले हे दोन्ही वाण भरघोस उत्पादन तर देतीलच मात्र या वाणांची गुणवत्ता देखील वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर नफा मिळणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
या नवीन वाणांना प्रसारित करण्याचे श्रेय कडधान्य पैदास विभागातील शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. राजपूत यांना जाते. ते ममुराबाद केंद्रातील तेलबिया संशोधन विभागातील काम करतात. त्यांनी उडिदाच्या वाणाला ‘फुले राजन’ हे नाव दिले आहे तर ‘फुले सुवर्ण’ या नावाने मुगाचे वाण प्रसारित केले आहे.
शेतात ‘फुले राजन’ चे राज
खरीप हंगामात उडीदाचे पीक घेण्यासाठी ‘फुले राजन’ हे वाण अत्यंत उत्कृष्ट असल्याचे डॉ. राजपूत यांचे म्हणणे आहे. या उडीदाच्या वाणापासून खरीप हंगामात कमी कालावधीत अधिक उत्पादन घेता येते. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील जमिनीसाठी हे वाण अतिशय गुणकारी आणि पोषक ठरणार आहे.
‘फुले सुवर्ण’ देणार उत्पादनाला झळाळी
‘फुले राजन’ प्रमाणेच ‘फुले सुवर्ण’ हे मुगाचे वाण देखील खरिपाची पेरणी करण्यासाठी उत्तम आहे. ‘फुले सुवर्ण’ या वाणाची पेरणी केल्याने अन्य वाणांपेक्षा भरघोस व जास्त उत्पादन दिल्याचे संशोधनातून देखील स्पष्ट झाले आहे. हा नवीन वाण कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारा ठरला आहे.
केळी खुंट कुट्टी यंत्रालाही मान्यता
कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीत ट्रॅक्टरद्वारा चालवले जाणारे केळी खुंट कुट्टी यंत्र आणि रसकाढणी यंत्रही अन्य संशोधकांनी प्रदर्शित केले आहे.
या दोन्ही यंत्रांनाही समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेणाऱ्या जळगावसह खान्देशातील शेतकऱ्यांसाठी ही दोन्ही यंत्रे अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.
या नव्या वाणांच्या बाबतीत बोलताना संशोधक डॉ. एस. डी. राजपूत म्हणाले, उडीद आणि मुगाच्या नव्या वाणांच्या संशोधनातून कमी कालावधीत आणि कमी मेहनतीतून जास्त उत्पादन घेता येईल. हे दोन्ही वाण प. महाराष्ट्रातील जमिनीसाठी अतिशय पोषक व सरस ठरणारे आहेत. निश्चितच या संशोधनातून उत्पादकांना फायदा मिळेल, यात शंका नाही. असेही त्यांनी सांगितले.