यंदा अतिवृष्टीसह सततच्या पावसाने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान केले. कापूस पिकाला देखील मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या घरात कापूस आला असला तरी 9 ते 9 हजार 500 रुपये प्रती क्विंटलपर्यंत गेलेले दर 8 ते 8 हजार 300 वर आले. त्यामुळे बाजारपेठेत कापसाची आवक घसरल्याचे चित्र दिसत आहे.

राज्यात साधारणतः 40-45 लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते. या मध्ये सर्वाधिक उत्पन्न विदर्भात घेतलं जातं. यवतमाळ जिल्ह्यात एकूण साडे आठ लाख हेक्टर लागवडी योग्य क्षेत्रात सर्वाधिक कापूस पिकच घेतल्या जाते. कापूस उत्पादनात अग्रसेर जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख देखील आहे. एकट्या परंतु, गतकाही वर्षात बोगस बियाणे, बोंडअळी, अतिवृष्टी, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ आदी. कारणांमुळे उत्पादनावर फटका बसत आहे .

यंदा देखील अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना गारद केले. या संकटातून वाचलेले कापसाचे पीक शेतकऱ्यांच्या घरी आले आहे. गतवर्षीपासून कापसाच्या दरात बऱ्यापैकी तेजी आहे. त्या तुलनेत हमीदर कमी आहे. त्यामुळेच गतवर्षी पणन महासंघाने खरेदी केंद्र सुरू केले नाही.

यंदा देखील कापसाचे दर विक्रमी होताच दिसत होते. 9 ते साडेनऊ हजार प्रती क्विंटलपर्यंत कापसाचे दर पोहोचले . त्यामुळे पणन महासंघ स्पर्धेत उतरणार नाही, हे स्पष्ट दिसले. त्यातूनच पणनचे एकही केंद्र सुरू झाले नाही. सीसीआयचे (Cotton Corporation of India) केवळ राळेगावात एक केंद्र सुरू झाले. तत्पूर्वीच बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या स्पर्धेत उतण्याची तयारी दाखविली होती .

मात्र गत काही दिवसांत कापसाचे दर 1 ते दीड हजाराने घसरले आहे.8 ते 8 हजार 200 रुपयांपर्यंतच कापसाला भाव मिळत आहे. कापसाचे दर अचानक कमी झाल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबविली आहे. त्यामुळे बाजारपेठेत कापसाची आवक प्रचंड कमी झाली आहे. शेतकऱ्यांना कापूस दरवाढीची प्रतीक्षा असून, गतवर्षीप्रमाणेच 10 ते 12 हजारांचा दर मिळेल, अशी अपेक्षा त्यांना आहे.

सोयाबीनचे दरही 5 हजारांवर..

विदर्भात कापसापाठोपाठ सोयाबीनचे उत्पादन घेतलं जातं. यवतमाळमध्ये अंदाजे अडीच ते तीन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी यावर्षी करण्यात आली होती. अतिवृष्टीचा फटका कापसाप्रमाणेच सोयाबीनला मोठ्या प्रमाणात बसला. अंदाजे 1 लाख हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान झाल्याचे आकडेवारीतून समोर आले होते .

सोयाबीनचे उत्पादन घटल्याने चांगलाच भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु सोयाबीनचे दर 5 हजार ते 5 हजार 200 ते 300 रुपयांपर्यंतच स्थिरावलेले आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे दर 2 ते अडीच हजारांनी कमी असल्याचे सांगितले जाते.

त्यामुळे सोयाबीनची उलाढाल देखील अपेक्षित नसल्याचे ऐकायला मिळत आहे. यामुळे एवढा अतिवृष्टीतून वाचवलेला सोयाबीन कमी दारात विकला जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *