रब्बी हंगामातील कांदा सध्या साठवणुकीच्या अडचणींमुळे शेतकऱ्यांनी बाजारात आणण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे हंगामाच्या शेवटच्या टप्यात ऑगस्टनंतर कांदा टंचाईमुळे दर वाढण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

गेल्या खरिपापाठोपाठ रब्बीतील कांदा दरानेही शेतकऱ्यांची साफ निराशा केली आहे. आता तर कडक उन्हाळा आणि वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर साठवणुकीतला कांदा नासण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त माल बाजारात पाठवण्यास सुरुवात केली आहे.

परिणामी बाजारात कादा आवक वाढल्याने दर पडलेले आहेत. आता आगस्ट महिन्यापासून आवक कमी होऊन ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात कांदाटंचाई जाणवू शकते, असा अंदाज बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. देशांतर्गत भाव पडल्यानंतर कांद्याच्या निर्यातीचा विचार कला जातो.

गुणवत्तेच्या आधार भारतातील कांदा बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळमध्ये पाठवलो जातो. पण बांगलादेशला सध्या निर्यात बंद असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्या देशात डॉलरचा तुटवडा असल्याने त्यांना सर्व प्रकारच्या आयातीवर मर्यादा आली आहे. अशा परिस्थितीत बांगलादेशसोबत रुपयांत व्यवहार करण्यासाठी भारताने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षाही बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, रब्बी हंगामात यंदा देशात 11 लाख 20 हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती . त्यापैकी महाराष्ट्रात 5 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्र होते. पण यंदा काद्याला पावसाचा फटका बसल्याने टिकवणक्षम कांद्याची उपलब्धता कमी झाली. त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत टिकेल. असा कांदा सरासरी साठ्यापेक्षा 30 टक्क्यांपर्यंत राहू शकतो. या पार्श्वभूमीवर कांदाटंचाईमुळे पुन्हा दर वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

निर्यातक्षम मालाला 800 ते 1200 रुपये दर..

एप्रिल महिन्यात बाजारात येणाऱ्या कांद्याची गुणवत्ता कमी असल्याने दर घसरले होते. पण मे महिन्यात पुन्हा दर्जेदार कांदा बाजारात येत आहे. कमी गुणवत्तेच्या कांद्याला सध्या 600 ते 700 रुपये, तर निर्यातक्षम दर्जेदार कांद्याला 800 ते 1200 रुपयांचा भाव मिळत आहे, असे बाजार तज्ज्ञांनी सांगितले.

सध्या नाशिक, सोलापूर, पुणे, अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील बाजारांमध्ये कांदा आवक सरासरीपेक्षा अधिक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *