देशभरात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. कुठे 160 रुपये , तर कुठे 200 रुपये किलोने टोमॅटोची विक्री केली जात आहे. अलीकडच्या काही दिवसांत काही ठिकाणी टोमॅटोच्या दराने दिलासा मिळतो न् मिळतो तोच आता कांद्याचे भाव भडकण्याची शक्यता आहे. कांदा सध्या अंदाजे 28 ते 32 रुपये किलोच्या आसपास रेंगाळत आहे.
ऑगस्टअखेरीस किरकोळ बाजारात कांद्याच्या भावात विक्रमी वाढ होऊन तो प्रतिकिलो 60 ते 70 रुपयांवर जाण्याचा अंदाज क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड ॲनालिटिक्सच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
मागणी – पुरवठ्यातील तफावतीचा परिणाम ऑगस्टच्या अखेरीस कांद्याच्या किमतीवर दिसून येण्याची शक्यता आहे. परिणामी सप्टेंबरच्या सुरुवातीपासून किरकोळ बाजारातील किमती 60 ते 70 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचू शकतात. पण या किमती 2022 मधील कमाल पातळीच्या खाली असतील, असे या अहवालामध्ये म्हटले आहे.
रब्बी हंगामातील कांद्याची साठवणूक आणि खप याचा दोन महिन्यांनी कमी झोलेला कालावधी त्याचप्रमाणे फेब्रुवारी मार्चमध्ये घबराटीतून झालेली विक्री यामुळे खुल्या बाजारात रब्बीचा साठा सप्टेंबरऐवजी ऑगस्टच्या अखेरीस लक्षणीयरीत्या घसरण्याची भीती आहे.
त्यामुळे कांद्याचा खप वाढण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरपासून खरीपाची आवक सुरू झाल्यानंतर काद्याचा पुरवठा अधिक सुरळीत होऊन भाव कमी होतील, असा अंदाज अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
कांद्याचे लागवडक्षेत्र 8 टक्क्यांनी कमी..
यावर्षी जानेवारी – मेदरम्यान कांद्याचे दर घसरल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र यामुळे खरीप हंगामात कांदा लागवडीपासून शेतकरी परावृत्त झाले. त्यामुळे कांद्याची कमी लागवड झाली. याचा परिणाम म्हणजे यंदा कांदा लागवडीखालील क्षेत्र 8 टक्क्यांनी घटणार असून, कांद्याचे खरीप उत्पादन दरवर्षीच्या तुलनेत 5 टक्क्यांनी घटणार आहे.
पहा आजचे कांदा बाजारभाव..