सिंहगड रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांना हडपसर परिसरात, तसेच त्यापुढे नगर रस्त्यावरील वाघोलीपर्यंत पोहोचता यावे, तसेच शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रोचे जाळे आणखी भक्कम करण्यासाठी खडकवासला – हडपसर – खराडी या पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गाने मेट्रो मार्गाच्या प्रकल्प अहवालाला शुक्रवारी (दि. 4 ऑगस्ट) पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत मान्यता देण्यात आली.
पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी नवीन विस्तारित मेट्रोच्या कामाचा डीपीआर तयार केला होता. यापूर्वी पुणे महानगरपालिकेने पुणे मेट्रोसाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले आहे. या प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेकडून जागाही मेट्रोला देण्यात आल्या. नवीन विस्तारित मार्गासाठी जमीन द्यावी लागणार आहे.
तरी महापालिका तयार असून, या प्रकल्पासाठी जमीन हस्तांतर करण्यासाठीही पुणे महानगरपालिकेने मान्यता दिली आहे. एक ऑगस्टपासून पुणे मेट्रोची वनाज ते पीएमसीसीपर्यंतची मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे.
शहरात नोकरीसाठी येणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या पाहता पुणे शहर आणि उपनगरात मेट्रो सेवा कार्यरत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार लवकरच शहरात आणि उपनगरात मेट्रो सेवा कार्यरत करण्यात येत आहे.
शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचेही काम सुरू केले आहे. एक आगस्टपासून सुरू झालेल्या पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हिंजवडी भागात दररोज सकाळी चार लाखांहून अधिक नागरिक येत असतात. याशिवाय विमाननगर परिसरातही नागरिकांची ये – जा मोठ्याप्रमाणात असल्याने स्वतः पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो तयार करण्यासाठी आग्रही आहेत. (Pune Metro)
यापार्श्वभूमीवर आता नव्याने हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. यामुळे सिंहगड रस्त्यावरील रहिवाशांना थेट पिंपरीत जाता येणार आहे. त्याचप्रमाणे हडपसर भागातील उद्योग व्यवसायानिमित्त वाघोलीपर्यंत जाणाऱ्या रहिवाशांना प्रवासाची सोय होणार आहे आणि हिंजवडी परिसरात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या खडकवासला, स्वारगेट , शिवाजीनगर, हिंजवडी असा प्रवास करता येणार आहे. पीएमआरडीए विकसित करत असलेल्या मेट्रो मार्गाचा या वेळी वापर करता येईल.
राज्य व केंद्राकडून मंजुरी मिळाल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे. पुणे मेट्रोच्या विस्तारित नवीन दोन मार्गांसाठी 9074. 24 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. याबाबतचा आराखडा 8 ऑगस्ट 2022 मध्ये तयार केला होता. त्याचे पुणे महानगरपालिकेला 27 सप्टेंबर 2022 मध्ये सादरीकरण केले आहे. शुक्रवारी (दि. 4) पुणे महानगरपालिकेने या सादरीकरण केलेल्या आराखड्याला मान्यता दिली आहे. लगेच हा आराखडा राज्य सरकार व केंद्र शासनाला पाठविण्यात येणार आहे.अशी माहिती महामेट्रोचे महाव्यवस्थापक जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे यांनी दिली आहे.
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात, प्रस्तावित HCMTR मार्गावर वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, एसएनडीटी ते वारजे, हडपसर ते खराडी, स्वारगेट ते हडपसर, खडकवासला ते स्वारगेट असे 82.5 किमी रेल्वेचे जाळे वाढविण्याची योजना आहे..
तत्पूर्वी सध्या खडकवासला ते खराडी मार्गे स्वारगेट आणि हडपसर मेट्रो रेल्वे मार्ग (25.862 किमी), पौडफाटा ते माणिकबाग मार्गे वारजे मार्ग (6.118 किमी) यासाठी 9,074.24 कोटी रुपये खर्च येणार आहेत. यासाठी, महा मेट्रो 4,354.84 कोटी रुपयांचे कर्ज उभारणार आहे, तर उर्वरित खर्च केंद्र, राज्य आणि पीएमसी सामायिक करतील, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी DPR च्या मंजुरीनंतर सांगितले..
मेट्रो विस्तारित मार्गिकेवरील स्थानके
SNDT वारजे माणिकबाग मार्गावरील स्थानके एकूण सहा स्थानके. – अंतर 6.118 किमी..
पौड फाटा, कर्वेपुतळा, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, वारजे, दौलतनगर.
खडकवासला – हडपसर – खराडी मार्गावरील स्थानके 22 तर 25.64 किलोमीटरचे अंतर असणार..
स्थानके :-
खडकवासला, दळवीवाडी, नांदेड सिटी, धायरी फाटा, माणिकबाग, हिंगणे चौक, राजाराम पूल, पु.ल. देशपांडे उद्यान, दांडेकर पूल, स्वारगेट पूल, सेव्हन लव्हज चौक, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, रेस कोर्स, फातिमा नगर, रामटेकडी, हडपसर, मगरपट्टा साऊथ, मगरपट्टा मेन, मगरपट्टा नॉर्थ, हडपसर रेल्वे स्टेशन, साईनाथ नगर, खराडी चौक ही 22 स्थानके जोडली जाणार..