कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलाव अर्धा तास बंद पाडले.
कांद्याला 30 रुपये प्रतिकिलो भाव द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने दिला.
सोमवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रात कांदा लिलावास सुरुवात झाली. मात्र कांद्याला 10 ते 12 रुपये प्रतिकिलो भाव मिळत असल्याने सतत कांद्याच्या भावात होणाऱ्या घसरणीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा लिलाव रोखले.
दिवाळीनंतर कांदा बाजारात लिलाव सुरू झाल्यावर भाव अपेक्षेप्रमाणे वाढले. 1 नोव्हेंबर रोजी कांद्याला किमान 1000 , तर सरासरी 2900 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. मात्र गेल्या 15 ते 20 दिवसांपासून कांद्याला किमान 500, तर सरासरी 1400 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असून, सरासरी भावात 1070 रुपयाची घट झाली आहे.
या भावात उत्पादन खर्चही भरून निघणार नसल्याने शेतकरी संतप्त झाले व त्यांनी लिलाव बंद पाडले. कमी भाव मिळत असल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजीही करण्यात आली .
इतर राज्यांमध्ये स्थानिक कांदा मोठ्या प्रमाणात आल्याने कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याच्या भावात घसरण होत असल्याची माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली आहे.