दिवाळीच्या नऊ दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू होताच दरात वाढ झाल्याचे बघायला मिळाले. नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याला समाधानकारक भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दिवाळीपूर्वी 21 ऑक्टोबरला लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची 14 हजार 792 क्विंटल आवक झाली होती.
तर बाजारभाव 600 ते 2350 व सरासरी 1860 रुपये प्रतिक्विंटल होते. दिवाळीनंतर सोमवारी समितीत 11 हजार 846 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होऊन 851 ते 3515 व सरासरी 2450 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
परतीच्या पावसाचा कांदा रोपांना तडाखा बसल्याने नवीन लाल कांद्याचा हंगाम यंदा लांबणीवर पडला आहे. साठवणुकीचा कांदाही कमीच असल्याने दरवाढीची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, या दरवाढीचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किती प्रमाणात मिळणार, याबाबत प्रश्नचिन्हच आहे.
सध्या बाजारात जुना कांदा उपलब्ध आहे. जुन्या कांद्याचा साठा संपत चालला आहे. त्यातच पावसामुळे चाळीत साठवलेल्या जुन्या कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम झाला असल्याने कांदादर वाढलेले असले तरी त्याचा फायदा फार थोड्या शेतकऱ्यांना होणार आहे. चाळीत साठवलेला कांदा हवामान बदलामुळे सडला असून, त्याचे वजन देखील कमी झाले आहे.
गत पाच महिने कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी अतिशय स्वस्तात कांदा विक्री केला आहे. मात्र, आता शेतकऱ्यांचा कांदा संपत आला असताना कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. मात्र, वाढलेल्या दराचा खूपच कमी शेतकऱ्यांना फायदा होत आहे. – राजाबाबा होळकर , कांदा उत्पादक शेतकरी , लासलगाव