ईस्टर्न फ्री – वे थेट कोस्टल रोडला जोडण्यासाठी ऑरेंज गेट – मरिन ड्राइव्ह प्रकल्प सुरू करण्याच्या दिशेने प्रशासनाने आणखी एक पाऊल टाकले आहे. हा प्रकल्प सुरू झाल्याने मुंबईच्या एका भागातून वाहने न थांबता कमी वेळात दुसऱ्या भागात पोहोचू शकणार आहेत.
या प्रकल्पाच्या भू – तांत्रिक तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे. 9.23 किमी लांबीच्या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी एकूण 35 ठिकाणी भू – तांत्रिक तपासणी केली जाणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) नुसार, 35 पैकी 7 ठिकाणी भू – तांत्रिक तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. या तपासणीत जमिनीच्या पृष्ठभागापासून किती खाली खडक आहे, पाण्याची पातळी काय आहे, माती कशी आहे, पायासाठी किती खोल खोदावे लागणार आहे. ई. तपास अहवालाच्या आधारे प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे.
ऑरेंज गेट – मरिन ड्राइव्ह प्रकल्पाची जबाबदारी लार्सन अँड टुब्रो कंपनीकडे देण्यात आली आहे. पावसाळा मुंबईत येण्यापूर्वीच कंपनीने आपले काम सुरू केले आहे. येत्या काही दिवसांत सर्व ठिकाणी भू – तांत्रिक तपासणीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जेणेकरून पावसाळा संपताच प्रकल्पाचे काम सुरू करता येणार आहे.
काय आहे हा प्रकल्प..
दक्षिण मुंबई ते उपनगरात वाहनांना सिग्नलमुक्त मार्ग देण्यासाठी 9.23 किमी लांबीचा कॉरिडॉर तयार होणार आहे. 9.23 किमी मार्गापैकी 6.23 किमी मार्ग भूमिगत होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ईस्टर्न फ्री-वे थेट कोस्टल रोडला जोडण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा कॉरिडॉर पी. डी’मेलो रोडवर असलेल्या ऑरेंज गेटपासून मरीन ड्राइव्हजवळ बांधल्या जाणाऱ्या कोस्टल रोडपर्यंत असणार आहे.
कॉरिडॉरच्या बांधकामासाठी 7,765 कोटी रुपये खर्च येणार आहे. 6.51 किमी लांबीचा हा बोगदा टनेल बोरिंग मशीन (TBM) च्या मदतीने बांधला जाणार आहे. बोगद्याचा व्यास 11 मीटर असेल. बोगद्यात वाहनांच्या वाहतुकीसाठी 2-2 लेन असतील. आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी, बोगद्यात अतिरिक्त 1 – लेन रस्ता तयार केला जाणार आहे.
मुंबई आणि उपनगरांना कसा होणार फायदा..
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे, कल्याण, भिवंडी, चेंबूर या दिशेकडून दक्षिण मुंबई किंवा उपनगरात जाणाऱ्या वाहनांना सिग्नलमुक्त मार्ग उपलब्ध होणार आहे. ईस्टर्न फ्री – वे चेंबूर इंडियन ऑइल जवळून सुरू होतो आणि CSMT जवळील पी. डी’मेलो रोड येथे संपतो. मरीन ड्राईव्ह ते मीरा – भाईंदर दरम्यान कोस्टल रोड तयार होत आहे. 9.23 किमी लांबीच्या कॉरिडॉरच्या निर्मितीमुळे हे दोन्ही प्रकल्प एकमेकांना जोडले जाणार आहे.
प्रकल्प वैशिष्ट्ये..
– एकूण लांबी 9.23 किमी
– 6.51 कि.मी मार्ग अंडरग्राउंड
– बोगद्याचा व्यास 11 मीटर
– 2 – 2 लेन
– 1-1 लेन इमर्जन्सी मार्ग
– जमिनीपासून 40 मीटर खाली
– मेट्रो कॉरिडॉरच्या खाली असणार बोगदा..