राज्याच्या तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस सक्रिय आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून पुढील दोन दिवसांत पुन्हा राज्यात ठिकठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राजस्थान आणि उत्तर गुजरातमध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात अवकाळी पावसाला अनुकूल वातावरण आहे. तसेच दक्षिण कर्नाटकपासून झारखंडपर्यंत समुद्रसपाटीपासून उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मागच्या काही दिवसांपासून विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली.
राज्यातील काही ठिकाणी जोरदार गारपिटीनेही तडाखा दिला आहे. त्याचबरोबर त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी पाऊस बरसत आहे. मंगळवारी ( दि. 21 ) सायंकाळपर्यंत मध्य महाराष्ट्रातील पुणे येथे 0.4 मिमी, नाशिक 0.8 तर कोकण भागातील मुंबई येथे 0.4 मिमी पावसाची नोंद झाली.
मंगळवारी राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूर येथे 35.8 अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे. तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे 12.3 अंश सेल्सिअस इतके होते.
दरम्यान, गेल्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र व विदर्भात पाऊस पडला. उर्वरित राज्यात हवामान कोरड़े होते. 22 ते 23 मार्चदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. तर 24 व 25 मार्चला कोकण वगळात उर्वरित राज्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहणार आहे.
पंजाबराव डख यांचा काय आहे अंदाज..
राज्यात 22 तारखेनंतर दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार असून कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यांत विजांसह अवकाळी पाऊस कोसळणार आहे. तसेच डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यात 24 आणि 25 रोजी हवामानात थोडासा बदल होणार आहे.
या दोन दिवशी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात ढगाळ हवामानाची शक्यता आहे. मात्र पाऊस पडणार नसल्याचे डख यांनी सांगितले आहे. तसेच शेतकऱ्यांना सल्ला देताना डखं यांनी सांगितलं की, 5 एप्रिल पर्यंत राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या गव्हाची आणि हरभऱ्याची हार्वेस्टिंग करून घ्यावी. कारण की 5 एप्रिल नंतर पुन्हा एकदा हवामान खराब होणार असून 5 एप्रिल नंतर पावसाची राज्यात शक्यता असल्याचा अंदाज डख यांनी बांधला आहे.