पिंपरी – चिंचवड महापालिकेमार्फत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नियोजित प्रकल्पापैकी मोशी येथील बोऱ्हाडेवाडी येथील एकमेव प्रकल्प आतापर्यंत पूर्ण झाला आहे. या गृहप्रकल्पातील 1 हजार 56 सदनिकांचा ताबा आतापर्यंत लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. तर, सदनिकेची रक्कम न भरल्यामुळे आणखी 232 सदनिकांचे वितरण शिल्लक आहे.

या प्रकल्पात 14 मजली 6 इमारती आणि एकूण 1 हजार 288 सदनिका आहेत. या प्रकल्पासह चहली आणि रावेत या प्रकल्पासाठी नागरिकांकडून जानेवारी 2021 ला 5 हजार रूपयांच्या डीडीसह अर्ज मागविण्यात आले.

त्या अर्जातून 27 फेब्रुवारी 2021 ला सोडत काढण्यात आली. पहिली यादी व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार नागरिकांनी बोऱ्हाडेवाडी प्रकल्पासाठी 8 लाख 71 हजार रूपयांचा स्वहस्सा टप्पाटप्पाने भरला, बांधकामात वाजपुरवठा व मीटर जोड, ड्रेनेजलाइन, पार्किंग, इमारतीभावातचा परिसर, सीमा भित आदी कामास विलंब झाल्याने सदनिका वितरणास विलंब झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बोऱ्हाडेवाडी प्रकल्पातील पाच लाभार्थ्यांना सदनिकांच्या चाव्या 1 ऑगस्टला पुण्यात झालेल्या कार्यक्रमात देण्यात आल्या. त्या कार्यक्रमातच सर्व लाभार्थ्यांना सदनिकेचे ताबापत्र देण्यात आले. सदनिकांच्या चाव्या देण्याची प्रक्रिया स्थापत्य विभागाकडून करण्यात आली. आतापर्यंत 1 हजार 56 लाभार्थ्यांना चाव्या देण्यात आल्या आहेत. काही रक्कम शिल्लक असल्याने तसेच, तांत्रिक अडचणीमुळे उर्वरित 232 लाभार्थ्यांना सदनिकेच्या चाव्या देणे शिल्लक आहे. त्याचेही वितरण लवकर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बोऱ्हाडेवाडी गृहप्रकल्पातील सर्व लाभार्थ्यांना सदनिकांच्या चाव्या देण्यात येत आहे. लाभार्थी आपल्या सोईनुसार येथे राहण्यास येत आहेत. महापालिकेच्या वतीने तेथे वीज व पाणीपुरवठा, ड्रेनेजलाइन, पार्किंग आदी व्यवस्था पुरविण्यात आली आहे. हाऊसिंग सोसायटीची नोंदणी प्रक्रियाही काही इमारतींच्या सदस्यांनी सुरू केली आहे.

– उल्हास जगताप, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी – चिंचवड मनपा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *