Pm Kisan Scheme : योजनेबाबत नवं अपडेट । OTP च्या जागी आधाराने होणार e-KYC, पहा लास्ट डेट…
शेतीशिवार टीम,14 एप्रिल 2022 :- पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये (PM Kisan Samman Nidhi) एक नवं अपडेट समोर आलं आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत ई-केवायसी (e-KYC) करण्याची अंतिम तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. याआधी ही अंतिम मुदत 31 मार्च होती, त्यानंतर ती 22 मे आणि आता 31 मे झाली आहे.
आता पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी 31 मे 2022 पर्यंत ई – केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहे.तसेच, आता ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया ऑनलाइन करता येणार नाही. आता पीएम किसान पोर्टलवरील ई-केवायसीचा (e-KYC) ऑप्शन काही काळासाठी काढून टाकण्यात आला आहे. म्हणजेच, आता तुम्हाला फक्त ऑफलाइन ई-केवायसी (e-KYC) करावं लागणार आहे. यासाठी तुम्हाला सीएससी (CSC) केंद्रावर जावं लागणार आहे.
किसान पोर्टलवर नेमकी काय आहे माहिती…
पीएम किसान पोर्टलवर एक संदेश चमकत आहे, ज्यात असे म्हटले आहे की, पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी (e-KYC) ई-केवायसी अनिवार्य आहे. बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी (Biometric authentication) कृपया जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा. OTP प्रमाणीकरणाद्वारे आधार आधारित ई- केवायसी तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. पीएम किसानच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसीची अंतिम मुदत 31 मे 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ई-केवायसी ऑफलाइन पूर्ण करण्यासाठी, लाभार्थी शेतकऱ्याला आधार कार्डसह कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट द्यावी लागेल. तेथे बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करावी लागणार आहे.
बायोमेट्रिक प्रमाणीकरण (Biometric authentication) म्हणजे काय ?
पीएम किसान पोर्टलवर दिलेल्या माहितीच्या आधारे, आता ई-केवायसी (e-KYC) केवळ बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारेच करावे लागेल. त्यासाठी CSC मध्ये जावे लागेल. आता प्रथम आपण बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे.
आधार कार्ड बनवताना त्या व्यक्तीच्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घेतला जातो. तसा आता जेव्हा तुम्ही ई-केवायसीसाठी (e-KYC) CSC केंद्राला भेट देता तेव्हा तुमच्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घेतला जाईल, आणि तो तुमच्या आधार कार्डावरील अंगठ्याच्या ठशाशी जुळला जाईल. दोन्ही अंगठ्याचे ठसे जुळत असल्यास, तुमची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल. याउलट, जर दोन्ही अंगठ्याचे ठसे जुळत नसल्यास, तर तुमचे ई-केवायसी पूर्ण मानले जाणार नाही…
KYC/ e-KYC साठी आवश्यक कागदपत्रे :-
पीएम किसान सन्मान निधीसाठी केवायसी / ई-केवायसीच्या ऑनलाइन प्रक्रियेप्रमाणे, काही कागदपत्रे आवश्यक आहेत, ज्यामध्ये आधार कार्ड सर्वात महत्त्वाचे आहे. यासोबतच आणखी अनेक कागदपत्रे आवश्यक आहेत जी खालीलप्रमाणे आहेत :-
लाभार्थी शेतकऱ्याचे आधार कार्ड
शेतकऱ्याचा पासपोर्ट ( असेल तर )
शेतकऱ्याचे मतदार ओळखपत्र
शेतकऱ्याचे ड्रायव्हिंग लायसन्स
शेतकऱ्याचे पॅन कार्ड
जमिनीची कागदपत्रे
बँक खात्याच्या तपशीलासाठी पास बुकची प्रत
येणार आहे PM किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता…
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत, देशभरातील सुमारे 12.53 कोटी शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केली आहे. यातील पुढील हप्ता पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. ई-केवायसी (e-KYC) करण्याचा सरकारचा उद्देश खोट्या शेतकऱ्यांना या योजनेपासून दूर ठेवण्याचा आहे, जेणेकरून खर्या शेतक-यांना पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळू शकेल. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, या योजनेशी संबंधित शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारकडून थेट त्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाते. ही रक्कम दर चार वर्षांच्या अंतराने प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना दिली जाते.
PM Kisan Samman Nidhi अंतर्गत किती शेतकऱ्यांनी केली नोंदणी…
पीएम किसान योजनेंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना एका आर्थिक वर्षात प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जातात. योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना 10 हप्ते देण्यात आले असून 11 वा हप्ता येणार आहे. देशात पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 12.53 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दल अधिक माहितीसाठी संपर्क :-
पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित कोणतीही माहिती मिळविण्यासाठी किंवा काही समस्या असल्यास तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक आणि ईमेल आयडी प्रदान केले आहेत. पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक 155261 आहे. याशिवाय पीएम किसान टोल फ्री क्रमांक 18001155266 आणि पीएम किसान लँडलाइन क्रमांक 011-23381092, 011-24300606 आहे. पीएम किसानची दुसरी हेल्पलाइन 0120-6025109 आहे आणि ई-मेल आयडी pmkisan-ict@gov.in आहे.