सध्या महाराष्ट्रात महापुरुषांच्या बद्दल केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांवरून महाराष्ट्रात गदारोळ उठला आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी याबाबत निषेध नोंदवला जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वक्तव्यावरील वाद ताजा असतानाच भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, भाजप आमदार प्रसाद लाड, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यांवरुनही मोठा वाद निर्माण झाला होता.

त्यातच चंद्रकांत पाटलांनीही महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. भाजप नेत्यांकडून सातत्याने असे प्रकार होत असल्याने या वादावर पडदा टाकण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून शिवसृष्टीसाठी निधी मंजूर केला असल्याचं बोललं जात आहे.

आज मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुण्यात साकारण्यात येणार असलेल्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाला राज्य सरकारकडून भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. अनेक शिवप्रेमींची मागणी असलेल्या या ऐतिहासिक प्रकल्पाला शिंदे सरकारने 50 कोटींचा निधी मंजूर केला आहे.

सध्या शिवसृष्टीचे काम युद्धपातळीवर सुरु असून यापूर्वी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाचं उद्घाटन २० नोव्हेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडणार होते.

मात्र काही कारणास्तव हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर हा कार्यक्रम डिसेंबरमध्ये होणार असल्याचं कळविण्यात आलं होतं. मात्र अजूनही याबाबत अनिश्चितता दिसून येत आहे.

छत्रपती शिवाजी महारांच्या विचारांचा सर्वत्र प्रचार व्हावा या उद्देशाने 1998-99 साली ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली होती. पुण्यातील नऱ्हे आंबेगाव येथे या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.

आशियातील खंडातील सर्वात मोठे ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प म्हणून हा प्रकल्प ओळखला जातो. शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांच्या दाव्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाची जाणीव करून देणे हा या थीम पार्कचा मुख्य उद्देश आहे.

थीम पार्क 16व्या आणि 17व्या शतकातील मराठा संस्कृतीवर आधारित असणार आहे. जे मुख्यत्वे छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनकाळ आणि स्वराज्याच्या संकल्पनेभोवती फिरते. हे थीम पार्क त्या काळातील ऐतिहासिक लँडस्केप, किल्ले, तीर्थक्षेत्र, बाजारपेठ, गावातील देखावे, दीपमाळ, विहिरी, चावडी यासारख्या गोष्टींचे चित्रण करते.

पहिल्या टप्प्यात काय काय होणार काम ? 

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मुख्य आकर्षण असलेल्या सरकारवाडाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

‘सरकारवाडा’ या भागात त्या काळातले कामकाजाचे ठिकाण, संशोधन ग्रंथालय, प्रदर्शन आणि बहुपयोगी सभागृह उभारण्यात येणार आहे.

शिवाय गड–किल्ल्यांची सफर, राज्याभिषेकाचा देखावा, छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका हे प्रसंग थ्री डी तंत्रज्ञान वापरुन साकारण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *