पुणे – सोलापूर महामार्गावर पुढील 25 वर्षांतील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन, हडपसर (रविदर्शन) ते उरुळी कांचन (खेडेकर मळा) यादरम्यान मेट्रोसह चार पदरी दुमजली उड्डाणपुलाचा अंतिम आराखडा तयार केला आहे. मंजुरीसाठी राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवला आहे.
शिरूरचा खासदार या नात्याने शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध महामार्गाच्या कामासाठी मागील चार वर्षांच्या काळात देशात सर्वाधिक असा सुमारे 30 हजार कोटी रुपयांचा निधी खेचून आणल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोणी काळभोरमध्ये दिली.
पुणे – सोलापूर महामार्गाप्रमाणेच नगर मार्गावर चंदननगर ते शिक्रापूर यादरम्यान मंजूर झालेल्या मेट्रोसह चारपदरी दुमजली उड्डाणपुलाचे काम पुढील काही दिवसांत सुरू होणार आहे. रविदर्शन ते उरुळी कांचन व चंदननगर ते शिक्रापूर यादरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर वरील दोन्ही मार्गावरील वाहतूक कोंडी कायमचीच संपेल, असा विश्वासही डॉ . कोल्हे यांनी व्यक्त केला.
हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत खासदार डॉ. अमाल कोल्हे, आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत शिरूर – हवेली विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी खासदार डॉ. कोल्हे यांनी ही माहिती दिली.
या वेळी बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, माजी संचालक आप्पासाहेब काळभोर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, राजेंद्र खांदवे, संतोष कांचन, महादेव कांचन, सनी काळभोर, हिरामण काकडे, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, श्रीनाथ ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप धुमाळ, लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर, माजी सरपंच माधुरी काळभोर, उपसरपंच ललिता काळभोर, सुभाष टिळेकर, अमित कांचन, भाऊसाहेब कांचन, रामदास चौधरी यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, पुणे ते नगर, नाशिक महामार्ग, पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वे आदी मोठे प्रकल्प मार्गी लागले आहेत. पुणे- सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीतून जनतेची सुटका करावी, यासाठी मागील काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी यांच्यासह संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेतलेल्या आहेत.
भूसंपादनातील बहुतांशी आक्षेपांचे निराकरण करण्यात यश आले आहे. दिल्लीत अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. अंतिम बैठक लवकरच होणार असून, या बैठकीत रस्त्याला मंजुरी मिळताच कामाला सुरुवात होणार आहे.
आमदार अशोक पवार म्हणाले, राज्यातील सरकार लोकहिताच्या कामांकडे दुर्लक्ष करत आहे. राजकीय व्यक्तींसह सर्वसामान्य माणसालाही वेठीस धरीत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले जात नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वाधिक निधी सर्व आमदारांना देण्याचे काम माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. मात्र, आत्ताचे सरकार निधी देण्यास टाळाटाळ करत आहे. शिरूर – हवेली मतदारसंघात आजपर्यंत नागरिकांच्या, महावितरणच्या, हॉस्पिटलच्या समस्या सोडविण्यावर भर दिला आहे.