Pune : पुण्याची वाहतूककोंडी सुटणार! कात्रज चौकाचा होणार कायापालट, फक्त 40 गुंठ्यासाठी 21 कोटींचा निधी, पहा असा असणार मार्ग..
दक्षिण पुण्यातील कात्रज चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आता पुणे महापालिकेकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार कात्रज चौकातील 40 गुंठे जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्या जागेच्या भूसंपादनापोटी 21 कोटी 57 लाख 60 हजार रुपये मोबदला देण्याचा प्रस्ताव आयुक्त विक्रम कुमार यांनी स्थायी समितीपुढे ठेवला होता.
या प्रस्तावाला शुक्रवारी (दि.14) मंजुरी देण्यात आली आहे. ही जागा ताब्यात आल्यानंतर कात्रज चौकातील वाहतूककोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
सध्या हा रस्ता फक्त 32 मीटरचा असून हा 84 मीटर पर्यंत रुंदीकरणाचा निर्णय घेतला होता. या 4 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 2 लाख 88 हजार चौरस मीटर जागा आवश्यक आहे. त्यापैकी 58 हजार चौरस मीटर जागेवर रस्ता आहे. तर 66 हजार चौरस मीटर जागा ताब्यात आली आहे. अजून 1 लाख 28 हजार चौरस मीटर जागेचे भूसंपादन आवश्यक होते.
परंतु कात्रजच्या मुख्य चौकात सर्व्हे नंबर 1/2 ही जागा संजय गुगळे यांच्या मालकीची आहे. शहराच्या 1987 च्या विकास आराखड्यानुसार 30 मीटर डीपी रोड आणि पार्कसाठी 6 हजार 200 चौरस मीटर जागा बाधित होती. त्यानंतर 2017 च्या विकास आराखड्यात हा रस्ता 30 मीटरऐवजी 60 मीटरचा करण्यात आला.
कात्रज – कोंढवा रस्ता आणि पुणे – सातारा रस्ता या दोन्ही रस्त्यांच्या मध्ये ही जागा बाधित होत आहे. या जागेबाबत संजय गुगळे उच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाने त्यांना मोबदला देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कात्रज चौकातील संजय गुगळे यांची जागा 2013 च्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार संपादित करण्यात येणार आहे.
या जागेच्या भूसंपादनासाठी पालिकेच्या पथ विभागाकडे निधी उपलब्ध नाही. त्यामुळे या भूसंपादनासाठी लागणारे 21 काटी 57 लाख 60 हजार रुपये वर्गीकरणादारे उपलब्ध करून दण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. त्याला शुक्रवार (दि. 14) च्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
उड्डाणपुलाचे काम लागणार मार्गी..
ही जागा ताब्यात आल्यानंतर वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या पिलरसाठी जागा लागणार आहे. जागा ताब्यात नसल्याने रखडलेले पुलाचे कामही जागा ताब्यात आल्यानंतर मार्गी लागणार आहे.
असे होणार काम..
– 3.5 किलोमीटर रस्त्याची लांबी
– बांधकामाचा खर्च – 200 कोटी
– 84 मीटर ऐवजी 50 मीटर रुंद करणार..
– 36 मीटरचा मुख्य रस्ता
– दोन्ही बाजूला 7.5 मीटरचा सर्व्हिस रस्ता
– सायकल ट्रॅक, पादचारी मार्ग, सेवा वाहिन्यांसाठी डक्टचे काम सध्या रद्द
– आत्तापर्यंत 28 टक्के काम पूर्ण..